पती-पत्नीतील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या नावाने घेतले पैसे
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पती-पत्नीच्या न्यायालयात सुरू असलेल्या वादात पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार या दोघांच्या पीएला देण्यासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
प्रफुल्ला मोतलिंग आणि वाजिद सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रफुल्ला मोतलिंग ही महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची सरचिटणीस आहे. तर वाजिद सय्यद हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. याशिवाय तक्रारदार महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांवरही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२२ पासून हा सर्व प्रकार सुरू असल्याचे ३१ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पिंपळे-गुरव परिसरात राहणाऱ्या तक्रारदार गृहिणीचे आणि तिच्या पतीचे कौटुंबिक वाद आहेत. या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल आहे. दरम्यान, काळाखडक वाकड येथील एका व्यक्तीने तक्रारदार महिलेची प्रफुल्ला मोतलिंग या महिलेची आणि वाजिद सय्यद याची भेट घडवून दिली.
पती बरोबर सुरू असलेल्या वादात हे दोघे तुम्हाला नक्की मदत करतील, असे आश्वासन तक्रारदार महिलेला देण्यात आले. तक्रारदार महिलेला न्याय मिळवून देतो, असे सांगत प्रफुल्ला मोतलिंग आणि वाजिद सय्यद यांनी दोन वेळा प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पीए मुसळे यांना हे १० हजार रुपये द्यायचे असल्याचे सांगितले. तसेच हे पैसे दिले तरच काम होईल, असेही आरोपींनी सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेने आरोपींना पुन्हा दहा हजार रुपये दिले.
काही दिवसांनी दोघा आरोपींनी तुझे काम वरिष्ठ पातळीवरून करणार आहोत, असे सांगत थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाने पुन्हा तक्रारदार महिलेकडून १० हजार रुपये घेतले. चार टप्प्यात ३० हजार रुपये घेतल्यानंतरही संबंधित महिलेचे काम झाले नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने आरोपींकडे पैशांसाठी आणि काम का केले नाही, अशी विचारणा करत तगादा लावला होता.
तक्रारदार महिला तगादा लावत असल्याने आरोपींनी पती, सासू-सासरे यांना बोलावून घेत एक बैठक घडवून आणली. परंतु, या बैठकीत तक्रारदार महिला आणि तिच्या सासरच्या मंडळीतील वाद मिटण्याऐवजी या तिघांनी तक्रारदार महिलेच्या अंगावर धावून जात तिला शिवीगाळ करून दमदाटी केली. या सगळ्या प्रकाराने त्रस्त झालेल्या महिलेने अखेर वाकड पोलिसांकडे धाव घेत तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी तक्रार अर्जाची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक ए. पी. लोहार तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.