राष्ट्रवादी काँग्रेस भवन आमचेच, ताब्यात द्या, नाहीतर...
विजय चव्हाण
‘राष्ट्रवादी काँग्रेस भवन आमचेच आहे, स्वत:हून ताब्यात द्या, नाहीतर थोड्याच दिवसांत नवीन भव्य कार्यालय उभारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे. सध्या पुण्यातल्या राष्ट्रवादी भवनचा ताबा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे आहे. त्यामुळे आता पुणे राष्ट्रवादीत कार्यालयाच्या मुद्द्यावरून नवा वाद पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत हे कार्यालय आपल्या नावावर असून यावर कोणीही दावा करू शकत नाही, असे म्हटले आहे. सध्या अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये जागोजागी पक्ष कार्यालयावरून वाद सुरू झाले आहेत.
राष्ट्रवादी भवनचा करार हा प्रशांत जगताप यांच्या नावे आहे. पक्षाचे कार्यालय जगतापांच्या नावावर असल्याने त्यांनी पक्षाची फसवणूक केल्याचा आरोपही दीपक मानकर यांनी केला आहे. दरम्यान, कार्यालय न दिल्यास थोड्याच दिवसात नवीन भव्य कार्यालय उभारणार असल्याचा इशाराच दीपक मानकरांनी प्रशांत जगताप यांना दिला आहे.
याबाबत दीपक मानकर म्हणाले की, अजितदादांनी माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. दादांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहे. पुण्यात सर्वच घटकातील लोकांना पक्षात सामावून घेत संघटना वाढवून मजबूत करण्याचे काम आमचे असणार आहे. येत्या काही दिवसांत आमच्या गटात इतरही काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे तर आहेतच, दुसऱ्या पक्षांचे नगरसेवकही आमच्या संपर्कात असल्याचे यावेळी दीपक मानकरांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय हे पक्षाचे आहे. ते आमचेच आहे. त्यासाठी कोणतीही विनंती करणार नाही. या कार्यालयाचा करार हा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून नाही तर वैयक्तिक स्वत:च्या नावावर करून पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप मानकरांनी केला आहे.
याबाबत प्रशांत जगताप म्हणाले की, जे कार्यालय उभारणीमध्ये नव्हते, त्यांनी दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. हे कार्यालय प्रशांत सुदाम जगताप या नावावर आहे. हे पक्षाच्या नावावर नोंद केलेले कार्यालय नसून प्रशांत सुदाम जगताप या नावावर करार करण्यात आला आहे. ज्यांनी नवीन गट काढला आहे, जे या नवीन गटाचे अध्यक्ष आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता जे काही दिसत आहे त्यावर विश्वास ठेवू नका. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
या कार्यालयावर दावा सांगण्याआधी या कार्यालयासाठी जागा शोधत असताना आपण कुठे होतात याचे आत्मचिंतन करावे. या संदर्भात तारेवरची कसरत करताना, सगळी जुळवाजुळव करताना आपण कुठे होतात याबाबत त्यांनी मनन व चिंतन करावे, असा टोला जगतापांनी मानकरांना लगावला आहे.
तसेच अजित पवार यांच्या गटाकडून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांना आपल्या पुढील लढाईमध्ये मी आपल्यासोबत सहभागी नसेन असे स्पष्ट सांगितले आहे. पुण्यातील ५० नगरसेवक नॉट रिचेबल असून ते पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असे जगताप म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.