नसे 'समर्था'घरचे श्वान; तरीही भलताच मान!
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
रस्त्यावर झोपलेल्या श्वानाच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारणाऱ्याला शोधून देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस प्राणिमित्राने जाहीर केले आहे. वल्लभनगर पिंपरी येथील यशवंत चौकामध्ये मंगळवारी (११ जुलै) रात्री ही घटना घडली होती. एका श्वानाच्या तोंडावरून गाडी घालून त्याला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाला असून, याबाबत पिंपरी पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
अॅड. प्रज्वल दुबे यांनी याबाबत पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्याचबरोबर याबाबत फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला असून, श्वानाला ठार मारणाऱ्या कारचालकाची माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले आहे. वल्लभनगरमधील यशवंत चौकात काही भटके श्वान आहेत. 'या श्वानांना येथून घेऊन जा', म्हणून काही लोकांनी तक्रारी केल्या आहेत. पण त्यानंतरही येथील श्वान नेण्यान न आल्याने 'आम्ही आमच्या पद्धतीने यांचा बंदोबस्त करू', असे काही जण बोलत असल्याचा आरोप ॲड. दुबे यांनी केला आहे.
दरम्यान, मंगळवारी एक कारचालक एका श्वानाच्या तोंडावरून गाडी घालत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. घटनेची ही माहिती समजल्यावर परिसरातील नागरिकांना गर्दी केली. परंतु, त्यानंतर लगेच कारचालक पसार झाला.
श्वानाच्या अंगावर गाडी घालून त्याला ठार मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये संबंधित वाहनाचा क्रमांक व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे अखेर गाडीचालक अथवा मालकाबाबत माहिती देणाऱ्याला रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा ॲड. दुबे यांनी केली. तसेच, याबाबत ७०२०२१२१२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी श्वान भुंकते म्हणून चाकू भोकसून त्याचा जीव घेण्याचा प्रकार नुकताच शहरात घडला आहे. त्याचबरोबर सांगवी येथे एका श्वानावर गोळीबार करण्यात आल्याची घटनादेखील घडली होती. शहरातील भटक्या श्वानांच्या नसबंदीवरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. यातील रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. त्यानंतर आता वल्लभनगर, पिंपरी येथील ही घटना समोर आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.