नरेंद्र मोदींनी दिले पिंपरी-चिंचवडला झुकते माप
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यात पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन केलेल्या सुमारे १ हजार ९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांपैकी १ हजार ७२० कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या भोसरी परिसरातील आहेत. यामध्ये मोशीतील ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि प्रधान मंत्री आवास योजना बोऱ्हाडेवाडी प्रकल्पावर नागरिकांनी प्रत्यक्ष येत आनंदोत्सव साजरा केला, तर डुडूळगाव आणि सेक्टर १२ येथील भूमिपूजन करण्यात आले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यामार्फत पंतप्रधान आवास योजना, वेस्ट टू एनर्जी अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या कार्यक्रमात भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रकल्पांचा बोलबाला दिसला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे समाविष्ट गाव मोशी आणि कचरा डेपो परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या डेपोमुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता येथे प्रतिदिन एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया आणि १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन बटन दाबून या प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यावेळी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी उपस्थितांनी जल्लोष केला. तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्पाअंतर्गत १२८८ घरांच्या किल्ल्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
‘व्हीजन-२०२०’ अंतर्गत हाती घेतलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्प पूर्ण झाला. यापुढील काळात प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शहराला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिक काम करीत राहणार असल्याचे आमदार महेश लांडगे म्हणाले.