देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, कसब्यात रवींद्र

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे गेली २९ वर्षे असलेला कसब्याचा गड महाविकास आघाडीने जमीनदोस्त केला. महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळवून दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा १० हजार ९१५ मतांनी पराभव केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:31 am
देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, कसब्यात रवींद्र

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, कसब्यात रवींद्र

महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपची २९ वर्षांची सत्ता उलथवली

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे गेली २९ वर्षे असलेला कसब्याचा गड महाविकास आघाडीने जमीनदोस्त केला. महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळवून दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा १० हजार ९१५ मतांनी पराभव केला. भाजपने टिळक कुटुंबीयांऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यापासून धंगेकर बाजी मारणार असे वातावरण होते. देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि कसब्यात रवींद्र धंगेकर अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. या चर्चेचे रूपांतर आजच्या निकालात झाले.       

कसब्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ या भाजपच्या पारंपरिक भागातूनही धंगेकरांनी चांगली कामगिरी केली. शुक्रवार पेठ, रविवार पेठ, कसबा या परिसरातून धंगेकरांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचा सहज विजय झाला. धंगेकर यांना ७३ हजार ३०९ आणि रासने यांना ६२ हजार ३९४ मते मिळाली. दुसरीकडे मोठी ताकद, यंत्रणा कामास लावताना भाजपने बालेकिल्ला पिंजून काढला. मात्र, धंगेकरांच्या वादळापुढे भाजपच्या रासनेंचा टीकाव लागला नाही. रासनेंना मोठ्या फरकाने पराभव 

पत्करावा लागला.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या मतदारसंघात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत. त्यातील १ लाख ३६ हजार ९८० जणांची मते वैध ठरली. खासदार गिरीश बापट यांनी पाच वेळा या मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत मुक्ता टिळक प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच येथे दुरंगी लढत पाहायला मिळाली. या पूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, कधी मनसे यांनीही उमेदवार उभे केले होते. कधी नाराजांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. यंदा महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट लढत झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धंगेकर यांना चांगली ताकद दिली. त्याचे फळ निकालाच्या रूपाने पाहायला मिळाले.

कसबा विधानसभा मतदारसंघातील रविवार पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ या भागातील मतदारांनी धंगेकर यांना चांगली साथ दिली. भाजपचे शक्तिस्थळ मानले गेलेल्या नारायण आणि सदाशिव पेठेत धंगेकर फारसे पिछाडीवर गेले नाहीत. परिणामी धंगेकर यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखली. काही फेऱ्यांमध्ये ते काहीसे पिछाडीवर गेले होते. मात्र, एकूण आघाडी कायम राखली. नंतर टप्प्याटप्प्याने त्यांची आघाडी वाढतच गेली.

इतरांपेक्षा नोटाला मते अधिक 

एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सतराव्या स्थानी नोटा (नन ऑफ द अबव्ह) अर्थात वरील पैकी एकही उमेदवार पसंतीचा नसल्याचे बटन होते. नोटाला १ हजार ४०१ मतदारांनी मत दिले आहे. रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने वगळता रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास ती १ हजार २७७ होते. म्हणजे नोटापेक्षाही कमी मते त्यांना पडली आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेल्या आनंद दवे यांना २९७ आणि सैनिक समाज पार्टीच्या तुकाराम डफळ यांना १५३ आणि अपक्ष नसीरुद्दीन शेख यांना २३८, अनिल हतागळे यांना १०८ मते पडली आहेत. इतर सर्वजणांना शंभरहून कमी मते पडली आहेत. अपक्ष अजित इंगळे यांना सर्वात कमी २६ मते मिळाली आहेत.

टिळकांना उमेदवारी नाकारल्याचा फटका ?

मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली जात होती. चिंचवडमध्ये जशी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तोच न्याय टिळक यांना का लावला नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी शिष्टाई केली. त्यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपचा पारंपरिक मतदार नोटाला मतदान करेल अथवा बाहेर पडणार नाही अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, टिळक यांना उमेदवारी न दिल्याचा भाजपला फारसा फटका बसला असेल असे चित्र मतदानावरून दिसत नाही.

माजी शिवसैनिक असलेले रविंद्र धंगेकर यांनी राज ठाकरेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून महापालिका गाठली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुणे भेटीवेळी धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेशी असलेले धंगेकरांचे जुने नाते आठवून कट्टर शिवसैनिकांनी आता ठाकरे समर्थकांनी कसब्यात धंगेकरांचा अतिशय जिद्दीने प्रचार केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने पाडले गेले त्यामुळे चिडलेल्या ठाकरे समर्थकांनी धंगेकरांच्या प्रचारासाठी दिवस-रात्र काम केल्याचे सांगितले जाते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story