ट्रॅफिक ‘बूथ’चं नेकेड ट्रूथ

मागील काही महिन्यांपासून शहरातील शेकडो चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना आडोसा मिळावा, यासाठी बूथ उभारण्यात आले आहेत, पण यातील एकाही बूथचा अजून वापर होताना दिसत नाही. काळ्या-पिवळ्या रंगांचे पट्टे असलेले बूथ तर कुलूपबंद आहेत. इतर अनेक बूथची स्थिती कचराकुंडीसारखी झाल्याचे चित्र आहे. बहुतेक चौकांमध्ये वाहतूक पोलीस रस्त्याच्या कडेला उभे राहून नियमन करतात. काही बूथमुळे वाहतुकीलाही अडथळा ठरत असला तरी पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 10:43 am
ट्रॅफिक ‘बूथ’चं नेकेड ट्रूथ

ट्रॅफिक ‘बूथ’चं नेकेड ट्रूथ

'बूथ'मुळे नियमन ना आडोसा; वाहतूक पोलिसांचा दुसरा 'आडोसा' शोधून लूटमार सुरूच

तन्मय ठोंबरे/राजानंद मोरे

tanmay.thombre/rajanand.more@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror/@Rajanandmirror

मागील काही महिन्यांपासून शहरातील शेकडो चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना आडोसा मिळावा, यासाठी बूथ उभारण्यात आले आहेत, पण यातील एकाही बूथचा अजून वापर होताना दिसत नाही. काळ्या-पिवळ्या रंगांचे पट्टे असलेले बूथ तर कुलूपबंद आहेत. इतर अनेक बूथची स्थिती कचराकुंडीसारखी झाल्याचे चित्र आहे. बहुतेक चौकांमध्ये वाहतूक पोलीस रस्त्याच्या कडेला उभे राहून नियमन करतात. काही बूथमुळे वाहतुकीलाही अडथळा ठरत असला तरी पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका संस्थेकडून वाहतूक पोलिसांसाठी शहराच्या अनेक चौकांमध्ये बूथ उभारले आहेत. डोक्यावर छत आणि तीन बाजूंनी उघडे असलेले हे बूथ दिसायला आकर्षक दिसतात, तर दुसऱ्या प्रकारचे बूथ हे आकाराने मोठे असून चारही बाजूंनी बंद आहेत. आतमध्ये ये-जा करण्यासाठी दरवाजा आहे. आतमध्ये पोलिसांना बसताही येऊ शकते, एवढी जागा आहे. ऊन, वारा, पावसापासून वाहतूक पोलिसांना संरक्षण मिळावे, तिथूनच त्यांना वाहतूक नियमन करता यावे, या उद्देशाने शेकडो चौकांमध्ये बूथ उभारण्यात आले आहेत, पण पोलिसांनाच त्याचा विसर पडल्याची स्थिती आहे.

मध्य भागातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यासह इतर काही प्रमुख व गजबजलेल्या रस्त्यांवर हे बूथ दिसतात. या रस्त्यांवर वाहनांची सतत कोंडी होते. त्यामुळे त्याच रस्त्यांवर हे बूथ अडचणीचे ठरत आहेत. पोलीस बूथमध्ये उभे न राहता रस्त्याच्या मधोमध किंवा कडेला उभे राहून नियमन करतात. काही बूथ वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यामुळे या बूथचे सर्वेक्षण करून वाहतुकीला अडथळा ठरणारे बूथ हटवण्याबाबतचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेतला जाणार होता. पण अद्याप त्याचे सर्वेक्षणच करण्यात आलेले नाही. तसेच या बूथचा वापरही अद्याप सुरू झालेला नाही.

अनेक बूथमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे. अनेक बूथ कचराकुंडी बनले असून त्याचा त्रास वाहनचालकांना होऊ लागला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही हा कचरा स्वच्छ केला जात नसल्याने तो वाढतच चालला आहे. 

अनेक चौकांमध्ये दिसणारे काळ्या-पिवळ्या रंगाचे बूथ पुणे महापालिकेने पोलिसांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी काही बूथ चौकांत न ठेवता पदपथांवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. असे असले तरी अशा प्रकारचे बूथ अजूनही कुलूपबंद आहेत. हे काम मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाले होते. अजूनही पोलिसांकडून त्याचा वापर होत नाही.

मुळात शहराच्या मध्य भागातील रस्ते आणि चौक अरुंद आहेत. तसेच इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ अधिक असते. अशा ठिकाणी बूथमध्ये उभे राहून नियमन करणे शक्य नाही. परिणामी पोलिसांकडून बूथवर फुली मारल्याचे दिसते. या विषयी ‘सीविक मिरर’शी बोलताना वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या बूथचे अजून सर्वेक्षण केले नसल्याचे मान्य केले. मी येण्यापूर्वी बूथ बसवण्यास सुरुवात झाली होती. तसेच अडथळा ठरत असलेल्या बूथचे सर्वेक्षण अजून केलेले नाही. त्याचा वापर का होत नाही, हे पाहावे लागेल, असे मगर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story