नको यम, मग पाळा नियम!

पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यावर आता थेट यमराजच अवतरले आहेत. ते रस्त्यावर फिरून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहनचालकांना करीत आहेत. नियम न पाळल्यास आपणास नाईलाजास्तव बरोबर न्यावे लागेल, असा इशाराही ते देत आहेत. अनोख्या पद्धतीने जनजागृती करणाऱ्या यमराजांची चर्चा आता शहरभर सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Wed, 18 Jan 2023
  • 04:36 pm
यम

यम

पिंपरी-चिंचवडमध्ये थेट रस्त्यावर उतरले यमराज; रस्ता सुरक्षेचे िनयम न पाळल्यास घेऊन जाणार

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यावर आता थेट यमराजच अवतरले आहेत. ते रस्त्यावर फिरून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहनचालकांना करीत आहेत. नियम न पाळल्यास आपणास नाईलाजास्तव बरोबर न्यावे लागेल, असा इशाराही ते  देत आहेत. अनोख्या पद्धतीने जनजागृती करणाऱ्या यमराजांची चर्चा आता शहरभर सुरू आहे.  

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम चिंचवड वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) राबवला आहे. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा यमराज तुम्हाला घेऊन जातील, असे आवाहन वाहनचालकांना यमराज करीत आहेत. हेल्मेट न वापरणे आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळावेत, असेही आवाहन यमराज करीत आहेत.

वाहने चालवताना अनेक लोक सुरक्षा साधनांचा वापर करीत नाहीत. पोलिसांनी मोहीम उघडल्यानंतर तेवढ्यापुरती सुरक्षा साधने वापरतात. शहरात हेल्मेट न वापरता दुचाकी चालवून झालेल्या अपघातात शेकडोजणांचा जीव गेला आहे. त्याचप्रमाणे हेल्मेट वापरल्याने अनेकांना जीवदानही मिळाले आहे. हेल्मेट वापरले नाही तर माझ्या दारात यावे लागेल, असा संदेश देत यमराजांनी नागरिकांशी संवाद साधला.

दरम्यान, प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. किमान आपल्या कुटुंबाचा विचार करून वाहने चालवावीत, असे आवाहन चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी केले. पाटील म्हणाले, "पिंपरी-चिंचवड हे मेट्रो शहर आहे. शहरात लाखो वाहने असून, अनेकांचा वाहतूक नियमांचे पालन न केल्याने मृत्यू होतो. सिग्नल न पाळणे, ओव्हर स्पीड, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट अशी वाहतूक नियमांची पायमल्ली वाहनचालक करतात. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी थेट यमराज आले आहेत. त्यांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. परंतु, पुन्हा पुन्हा चूक करणाऱ्यांना यमराज माफ करतीलच असे नाही."

 

रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख मृत्यू

देशात दरवर्षी दीड लाख लोकांचा जीव अपघातात जातो. पिंपरी-चिंचवडमध्येही दरवर्षी अपघातात किमान २५० जणांचा जीव जातो, तर १५० पेक्षा अधिक लोक कायमचे जायबंदी होतात. त्यामुळे दरवर्षी जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. कोरोना काळानंतर २०२२ मध्ये खबरदारीच्या नियमांचे पालन करीत हा सुरक्षा सप्ताह पार पडला. मात्र यंदा हा सप्ताह जोषात होणार असल्याचे सूतोवाच वाहतूक शाखेकडून केले गेले आहे. संपूर्ण सप्ताहात नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयक जनजागृती निर्माण व्हावी, या दृष्टीने दररोज वाहतूक नियमांच्या वेगवेगळया विषयांवर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात हेल्मेट डे, सीट बेल्ट डे, नो सिग्नल जम्पिंग डे, नो हाँकिंग डे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर न करणे, वन डे विथ ट्रॅफिक पोलीस, जड-अवजड वाहने डाव्या बाजूने चालविणे, नो फॅन्सी नंबर प्लेट, नो टिंटेड ग्लास आदी विषयांवर जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story