Pradhan Mantri Matru Vandana Yojana Logo
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@rajanandmirror
केंद्र सरकारच्या पंतप्रधान मातृ वंदना योजनेत नेहा शेख यांनी तीन महिन्यांच्या गर्भवती असताना नाव नोंदवले होते. त्यानुसार त्यांना सुरुवातीलाच एक हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणे अपेक्षित होते. त्या एक जानेवारी रोजी एका मुलीच्या आई बनल्या तरी एक रुपयाही त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. महापालिकेच्या रुग्णालयात सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून नकारघंटाच आली. केंद्र सरकारकडूनच पैसे जमा केले जात नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मार्च २०२२ पासून या योजनेतील पैसे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
केंद्र सरकारने २०१७ मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान मातृ वंदना योजनेतील लाभार्थी मागील काही महिन्यांपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरातील साडेतीन हजारांहून अधिक महिलांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामध्ये नेहा शेख यांचाही समावेश आहे. कमला नेहरू रुग्णालयात त्यांनी योजनेसाठी नावनोंदणी केली होती. त्याच रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली. नेहा यांचे पती नईम यांनी नावनोंदणी केल्यापासून याबाबत रुग्णालयात सातत्याने विचारणा केली. पण त्यांना ठोस कोणतीही माहिती मिळाली नाही.
मातृ वंदना योजना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचा निधी दिला जातो. गर्भवती महिलांचे पोषण तसेच बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने केंद्राने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये पुणे महापालिकेला १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ८६ हजार ९७२ इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ७२ हजार ७८२ मातांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे निधी मिळाला आहे. पण कोरोना साथरोगानंतर मागील वर्षी साधारणपणे मार्च महिन्यापासून निधी मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मार्च महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही. महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, तिसरा हप्ता म्हणजे प्रसूतीनंतर मिळणारे दोन हजार रुपये ५९ महिलांना मिळालेले नाहीत.
तर दुसरा हप्ता न मिळालेल्या महिलांची संख्या १३८ एवढी आहे. एकही रुपया न मिळालेल्या महिलांची संख्या ३ हजार ५१८ एवढी आहे. या महिलांची नोंद असूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यापैकी अनेक महिलांची प्रसूतीही झाली, पण
तरीही पैसे जमा होत नाहीत. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत. ही योजना केंद्र सरकारची असून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने अधिकारीही हतबल आहेत.
याविषयी नईम शेख म्हणाले, कमला नेहरू रुग्णालयात गेल्यानंतर आम्हाला योजनेबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही नोंदणी केली. दोन महिन्यांनी त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोन-तीन वेळा चौकशी केली. पण तेच उत्तर मिळाले. आता एक जानेवारी रोजी आम्हाला मुलगी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयात जाऊन सांगितले. पण तेव्हाही वेगळे उत्तर नव्हते. केंद्र सरकारकडूनच निधी जमा होत नसल्याचे सांगितले जात आहे. निधी न मिळाल्याने आमची काही अडचण झाली नाही, पण अनेकांना याची गरज असते. आमच्या आधीही अनेकांना मिळाले. त्यामुळे त्याची वाट पाहात आहे.
पंतप्रधान मातृ वंदना योजनेचे पाच हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडूनच जमा केले जातात. पण मागील वर्षी मार्च महिन्यापासून पैसे जमा होण्यात अडचणी येत आहेत. त्याआधी बहुतेक लाभार्थ्यांना नियमितपणे पैसे मिळत होते. त्यामुळे आम्ही आमचे उद्दिष्ट ८३ टक्के पूर्ण केले आहे.
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.