नापास ठरवलेली विद्यार्थिनी झाली पास

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निकालात केलेली गंभीर चूक दुरुस्त केली आहे. इंग्रजी पेपर दिलेल्या विद्यार्थिनीला मराठीत नापास दाखवणाऱ्या विद्यापीठाने तिला उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र दिले आहे. `सीविक मिरर`ने केलेल्या पाठपुराव्यानंतर विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयांकडून चुकीची दुरुस्ती झाली. सुधारित निकाल द्यावा म्हणून भटकणाऱ्या विद्यार्थिनीच्या हातात तब्बल चार महिन्यांनंतर उत्तीर्ण झाल्याचा निकाल पडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Tue, 17 Jan 2023
  • 02:55 pm
श्रुती फेंगसे, विद्यार्थिनी

श्रुती फेंगसे, विद्यार्थिनी

इंग्रजीचा पेपर देऊन मराठीत अनुत्तीर्ण करण्याची चूक िवद्यापीठाने सुधारली

राहुल शिंदे 

rahul.shinde@civicmirror.in

TWEET@rahulsmirror

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निकालात केलेली गंभीर चूक दुरुस्त केली आहे. इंग्रजी पेपर दिलेल्या विद्यार्थिनीला मराठीत नापास दाखवणाऱ्या विद्यापीठाने तिला उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र दिले आहे. `सीविक मिरर`ने केलेल्या पाठपुराव्यानंतर विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयांकडून चुकीची दुरुस्ती झाली. सुधारित निकाल द्यावा म्हणून भटकणाऱ्या विद्यार्थिनीच्या हातात तब्बल चार महिन्यांनंतर उत्तीर्ण झाल्याचा निकाल पडला आहे.

News

पुणे विद्यापीठाशी संलग्न खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या श्रुती फेंगसे या विद्यार्थिनीला इंग्रजी विषयाची परीक्षा दिलेली असताना मराठी विषयात नापास दाखवण्यात आले होते. प्रथम वर्षात उत्तीर्ण असल्याशिवाय तृतीय वर्षात प्रवेश दिला जात नाही. कोरोनामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होणार होता. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात (प्रोव्हिजनल) प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. प्रथम वर्षात अनुत्तीर्ण असल्यास तृतीय वर्षात प्रवेश मिळत नाही. तरीही श्रुतीला तृतीय वर्षात प्रवेश मिळाला. तिने तृतीय वर्षाची परीक्षा दिली. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मराठी विषयात अनुत्तीर्ण असल्याचे दाखवले.  

संबंधित विद्यार्थिनीच्या निकालाची योग्य पद्धतीने तपासणी करून तिला उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित होते. मात्र, ही चूक दुरुस्त करून मिळावी यासाठी तिने चार महिने महाविद्यालय व विद्यापीठाच्या परीक्षा विभागात फेऱ्या मारल्या. आता, विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व महाविद्यालयांमध्ये नियमितपणे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनाचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. निकाल चुकीचा आला असला तरी श्रुतीने व तिच्या कुटुंबीयांनी निराश न होता अचूक निकाल येण्याची वाट पाहिली. तोपर्यंत श्रुतीने बँकिंगच्या परीक्षांची तयारी सुरू केली. परंतु, या परीक्षेला बसण्यासाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र आवश्यक होते. अखेर सोमवारी महाविद्यालयाने श्रुतीकडे उत्तीर्ण प्रमाणपत्र सुपूर्द केले. त्यामुळे कमीत कमी ती बँकिंगची परीक्षा देऊ शकणार आहे.

श्रुतीचे वडील संतोष फेंगसे म्हणाले, उत्तीर्ण असूनही श्रुतीला नापास दाखवण्यात आले होते. त्यामुळे ती खचून गेली होती. कुटुंबीयांनी तिला आधार दिला. आम्ही विद्यापीठ व महाविद्यालयाकडे तिच्या निकालात दुरुस्ती करून मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर त्याला यश आले; याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे.

 

उशिरा का होईना मला पासिंग सर्टिफिकेट मिळाले. सध्या कुठल्याही पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मी बँकिंगच्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत आहे. या परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी पासिंग सर्टिफिकेट मिळणे आवश्यक होते. आता मी बँकेच्या परीक्षा देऊ शकेल.

- श्रुती फेंगसे, विद्यार्थिनी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story