मटण आणि देवदर्शन
सीविक मिरर ब्यूरो
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन शनिवारी महादेवाचे तसेच अन्य देवतांचे दर्शन घेतल्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक व्हीडीओ शेअर केला आहे. मटण खाऊन दर्शन घेतल्यावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांना याविषयी विचारले असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळले.
शिवतारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मांसाहरी जेवण केले. त्यानंतर त्यांनी महादेव आणि सासवडला सोपानकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला, अशी खोचक टीका शिवतारे यांनी पोस्टमध्ये केली आहे.
दरम्यान, या संदर्भात विचारलं असता सुप्रियाताई म्हणाल्या की, “मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. कारण याबाबत मला काहीही माहिती नाही. आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
"माझा अभ्यास या विषयावर खूपच कमी आहे. तुम्ही जर पाण्यावर, बेरोजगारीवर तसेच आजच्या अर्थव्यवस्थेवर मला प्रश्न विचारल तर मी त्यावर सांगेन. पण माझा यावर अभ्यास खूपच कमी आहे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना एका पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांच्या पर्यंत पोहचवल्या असतील तर अर्थात या देशात काय परिस्थिती आहे यावर चर्चा व्हायला पाहिजे. आमची केंद्राला विनंती आहे की, लोकसभेमध्ये महागाईवर चर्चा व्हायला पाहिजे. गॅस दरवाढीबरोबर महागाई आणि बेरोजगारी या विषयांबद्दल आम्ही बोलत आहोत. आपली निर्यात कमी झाली आहे.
देशात कांद्याला भाव नाही. पॉलिसी लेवलवर काय काम करत आहे सरकार, यावर चर्चा व्हायला पाहिजे, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.