बेपत्ता आयटी अभियंत्याचा खून
सीविक मिरर ब्यूरो
नाशिक मार्गालगत घाटात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली आहे. मात्र त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा तरुण हिंजवडी आयटी पार्क येथे कंपनीत अभियंता म्हणून कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. खेड पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ नंदलाल पाटील ( वय २३ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २८ जुलैपासून हा तरुण बेपत्ता होता. मात्र रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सौरभ याचे नातेवाईक संदीप सोनावणे यांनी हिंजवडी पोलिसात हरवल्याची तक्रारदेखील दिली होती. मात्र त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात आढळला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाटील हा हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत कामाला होता. मात्र गेल्या आठवडाभरापासून तो बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. अखेर नातेवाईकांनी हिंजवडी पोलिसात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याची दुचाकी ही खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच त्याची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. मात्र तरी देखील त्याचा शोध कुठे लागत नव्हता.