धारदार शस्त्रांनी वार करून सराईत गुन्हेगाराचा खून

पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्वे रस्ता येथे शुक्रवारी (दि. २४) घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 25 Feb 2023
  • 02:46 pm
धारदार शस्त्रांनी वार करून सराईत गुन्हेगाराचा खून

धारदार शस्त्रांनी वार करून सराईत गुन्हेगाराचा खून

मोक्कानुसार झाली होती कारवाई, पूर्ववैमनस्यातून तीन ते चारजणांनी केले वार

# कर्वेनगर 

पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्वे रस्ता येथे शुक्रवारी (दि. २४) घडली.

नंदू जाधव (वय २२) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी तीन ते चार हल्लेखोरांविरुद्ध अलंकार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. नंदू जाधवचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध वारजे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत  (मोक्का) काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मोक्का कारवाई झाल्यानंतर त्याने न्यायालयाकडून जामीन मिळवला होता. जामीन मिळवल्यानंतर तो काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला होता.

 नंदू हा रात्री अकराच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील पीएनजी ज्वेलर्ससमोरून पायी घरी निघाला होता. त्याचवेळी हल्लेखोर त्याच्या मागावर लक्ष ठेवून होते. रस्ता ओलांडणाऱ्या नंदूवर अचानक तीन ते चौघाजणांनी तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नंदू रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नंदूला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. नंदूचा खून करणारे चार हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार करून आरोपींच्या अटकेसाठी रवाना केली. नंदूचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय अलंकार पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींची नावे पोलिसांना निष्पन्न झाली असून त्यांचा माग काढणे सुरू आहे. याबाबत अलंकार पोलीस पुढील तपास करीत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story