पालिकेचे कर्मचारी लाचखोरीच्या मोहिमेवर
विजय चव्हाण
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. चतु:श्रुंगी पाणीपुरवठा विभागात ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश राजाराम कवठेकर (वय ५४) असे या मीटर रिडरचे नाव आहे. तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला शिवाजीनगर येथील मिळकतीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यायचे होते.त्यासाठी तक्रारदार यांनी कर्वे रस्त्यावरील चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात अर्ज केला होता. तक्रारदार पाणीपुरवठा विभागात गेले. त्यावेळी कवठेकर याने ना-हरकत प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. याविरुद्ध तक्रारदाराने ‘एसीबी’च्या कार्यालयात अर्ज दिला होता.
‘‘अर्जाच्या पडताळणीत कवठेकर याने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये आणि स्वत:साठी पाच हजार रुपये असे एकूण २५ हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी (दि. ११) चतु:श्रुंगी पाणीपुरवठा विभागात सापळा रचून कवठेकर याला लाच घेताना ताब्यात घेतले,’’ अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिली.
‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत. याआधीही अर्जित रजेच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेतील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३० जूनला अटक केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.