त्यांची जिवाची मुंबई; पोलिसांसह कुटुंबांना घोर
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
शाळा बुडवून दहावीतील दोघे आणि आठवीतील एक असे तिघे मित्र थेट मुंबईला गेले. जिवाची मुंबई ऐकली आहे पण आता पाहायची आहे, असे म्हणत तिघे मुंबईला गेल्याने हिंजवडी पोलिसांसह कुटुंबाच्या जिवाला तीन दिवस घोर लागला होता. तीन अधिकारी, नऊ कर्मचारी आणि कुटुंबाने मावळ पट्ट्यासह मुंबईत रेल्वे पोलिसांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर हे मित्र घरी परतले आहेत.
हिंजवडी भागातील लक्ष्मी चौकात राहणाऱ्या तिघांपैकी दोघे मारुंजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकतात. एकजण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकतो. काही दिवसांपूर्वी हे तिघे कासारसाई धरण परिसरात फिरायला गेले होते. त्यामुळे घरी आल्यावर दहावी शिकणाऱ्या एका मुलाला त्याची आई रागावली होती.
घरातील लोकांना सांगितल्याशिवाय कुठेही फिरायला जायचे नाही, असे तिघा मित्रांना कुटुंबीयांनी दरडावले होते. परंतु, या तिघांनी कासारसाई धरणावरच जिवाची मुंबई करायला जायचे निश्चित केले होते. तिघांनी २२ जुलैला दुपारी रिक्षाने पुणे रेल्वे स्टेशन गाठले. तिघांनी तिकीट काढून ठाणे जंक्शन गाठले.
रात्र झाल्याने ठाणे जंक्शनवर तीन ब्लँकेट विकत घेऊन स्टेशनवर जेवण करून तिघे झोपले. दुसरीकडे तिघे शाळेची वेळ झाल्यानंतरही घरी न आल्याने तिघांच्या कुटुंबाने आसपासच्या परिसरात शोध घेतला. परंतु, तिघे कुठेच नसल्याने हे कुटुंब हिंजवडी पोलिसांकडे आले. यावेळी या तिघांचे अन्य मित्र होते. या मित्रांकडे चौकशी केली असता, या तिघांनी आम्ही पवना डॅम आणि एकविरा देवी भागात फिरायला जाणार असल्याचे यापूर्वी सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. तिघेही अल्पवयीन असल्याने वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी फौजदार महेंद्र गाढवे यांच्यासह तीन टीम तयार केल्या.
पोलिसांच्या तिन्ही टीम कुसगाव डॅम, पवना डॅम, एकविरा देवी, लोणावळा, मुळशी धरण येथे प्रत्येकी एक टीम पाठविण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात होते. त्यामुळे तांत्रिक साहाय्यकाची मदत तपासासाठी होत नव्हती. ठाणे जंक्शनवर रात्री झोप झाल्यानंतर २३ तारखेला सकाळी तिघांनी मुंबई श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई (सीएसटी) येथे जाण्यासाठी लोकलचे तिकीट काढले. तिथे गेल्यावर गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, फॅशन स्ट्रीट हा परिसर तिघेही चालत फिरले आणि २३ तारखेला पुन्हा सीएसटीवर झोपले. मात्र, तिसऱ्या दिवशी दहावीतील एका मुलाने सकाळी झोपेतून उठल्यावर २४ तारखेला मला आई-वडिलांशिवाय करमत नाही असे सांगितले. मी आई-वडिलांकडे परत जातो, म्हणत दहावीतील हा मुलगा रेल्वेने खडकी स्टेशन येथे आला. तेथून लोकांकडे लिफ्ट मागत तो रात्री हिंजवडी भागात पोहोचला.
पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने ठाणे ते मुंबई हा प्रवास सांगितला. त्यामुळे २४ तारखेला रात्रीच हिंजवडी पोलिसांचे एक पथक आणि कुटुंबीयांनी मुंबई रेल्वे स्टेशन गाठले. त्यामुळे ठाणे ते मुंबई या मार्गावरील दुतर्फा रेल्वे स्थानकांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली. परंतु, दोघेही कुठेच आढळून आले नाहीत. दरम्यान, एका लांब पल्ल्याच्या रेल्वेत बसून चवथ्या दिवशी २५ तारखेला रात्री उशिरा हे दोघे हिंजवडीत दाखल झाले. दोघे घरी परत आल्याची माहिती हिंजवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर दोन्ही मुलांचे पालक आणि पोलिसांचे पथक पुन्हा हिंजवडी भागात परतले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.