वाहनचालक शोधताहेत खड्डाविरहित रस्ता
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पावसाळ्याला म्हणावी तशी सुरुवात झाली नसली तरी पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर ठिक-ठिकाणी खड्डे पहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र, शहरातील ८३ टक्के खड्डे म्हणजेच १८०० खड्डे भरून काढल्याचा दावा शहर अभियंत्यांकडून केला जात आहे.
हलक्या पावसाला सुरुवात झाली की पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आता नागिरकांना नवीन राहिलेले नाही. प्रत्येक पावसाळ्यात आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. परंतु, वस्तुस्थिती भिन्न असल्याने नागरिकांना सगळ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या ४५ दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने १८०० हून अधिक खड्डे हेरून ते बुजवल्याचे सांगितले जात आहे. दर सोमवारी शहर अभियंत्याकडून याचा आढावा घेतला जात असून, त्यानंतर ही आकडेवारी उजेडात आणली जाते.
औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अवजड वाहतूक, शहरातील अंतर्गत वाहने आणि शहरातून अन्यत्र जाणारी वाहने अशा काही लाख वाहनांचा महिन्याला प्रवास होत असतो. शहरात एक जूनपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अगदी शंभर मीटरच्या अंतराने खड्डे पहायला मिळत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातून जाणारा पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्गावरही खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर १५ दिवसांपूर्वी खड्डे भरून काढण्यात आले होते. मात्र, १५ दिवसांतच पुन्हा या ठिकाणचा रस्ता पुर्णत: उखडलेला आहे.
हिंजवडी आयटीपार्कमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर ही परिस्थिती असल्याने येथील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्याचबरोबर शहरातील काही भागांमध्ये रस्त्याचे व पदपथाचे काम सुरू असल्याने याठिकाणी वाहनचालक व दुचाकीस्वारांना ये-जा करताना त्रास होत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे याठिकाणी बांधकामात वापरलेली वाळू रस्त्यांवर काही ठिकाणी विखुरलेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका संभवत आहे. निगडी, प्राधिकरण, मोशी, तळवडे, पूनावळे, ताथवडे, वाकड, चिंचवड, कासारवाडी, रावेत, दापोडी आदी भागात सर्वत्र एकसारखीच परिस्थिती पहायला मिळत आहे.
मेट्रोचे काम सुरू असताना दापोडी ते निगडी भागातील ग्रेड सेपरेटरमध्ये सिमेंट रस्त्यांवर खड्डे पडले होते. गेल्या तीन वर्षांपासून येथील खड्डे पुर्णत: दुरूस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मेट्रोने पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ववत करून द्यावा, असे पत्र मेट्रोला यापूर्वीच दिले आहे. तर मेट्रोने सिमेंट रस्त्यांवरील खड्डे डांबरीकरणाने भरले आहेत.
दर सोमवारी आम्ही शहरातील परिस्थितीची आकडेवारी संकलित करीत असतो. मागील सोमवारपर्यंत ८३ टक्के खड्डे भरून काढले आहेत. त्यानंतर यामध्ये निश्चितच वाढ झाली असेल, असा दावा शहर अभियंता मकरंद निकम यांनी केला आहे. तसेच पुढील काही दिवसात आम्ही उर्वरित खड्डे भरून काढू, असेही निकम यांचे म्हणणे आहे.
मात्र, रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवाशांनी महापालिकेवर टीका केली आहे. रस्तेबांधणी आणि रस्ते दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करूनही दर पावसाळ्यात जनतेला खड्डेमय रस्ते कसे मिळतात, हे न उलगडणारे कोडे असल्याची प्रतिक्रिया व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दररोज प्रवास करणारे विनोद जोकारे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.
महापालिकेने ज्या पद्धतीने रस्ते बांधले आहेत त्यात सुरुवातीलाच भ्रष्टाचार झाला आहे. अकार्यक्षम कंत्राटदारांची नियुक्ती केली गेल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्याने शहरात खड्डेमय रस्ते पहायला मिळतात, असे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.