मोटरसायकल चोरणारी टोळी जेरबंद, नऊ अटकेत
सीविक मिरर ब्यूरो
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १०) मोठी कारवाई करताना मोटरसायकली चोरणाऱ्या आंतर जिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या.
या टोळीकडून पोलिसांनी सुमारे १० लाख रुपये किमतीच्या २९ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागांतून त्यांनी या मोटरसायकली चोरल्या होत्या. या टोळीच्या दोन म्होरक्यांसह ९ आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली. अमोल नवनाथ मधे, विजय संजय मधे, संतोष उमेश मधे, विकास साहेबराव मधे, संदीप सुभाष मधे, (सर्व रा. पारनेर, जि. अहमदनगर), विजय विठ्ठल जाधव, सुनील वामन मेंगाळ, भारत पोपट मेंगाळ, मयूर गंगाराम मेंगाळ (सर्व रा. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
पुणे जिल्ह्यात मागील वर्षभरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी या घटनांचा आढावा घेतला आणि माेटरसायकल चाेरी करण्याची वेळ, निवडलेली ठिकाणे, चाेरी करण्यासाठी वापरण्यात येणारे मार्ग तसेच चाेरट्यांनी अवलंबलेली पद्धत याचा बारकाईने अभ्यास करत पोलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी प्रथम पुणे-नाशिक रस्त्याची निवड केली गेली. त्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले.
या टोळीतील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील माेटरसायकल चाेरीचे तसेच घरफाेडीचे एकूण २६ गुन्हे उघडकीस आले. या घटनेतील २९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत १० लाख रुपयांच्या घरात जाते. चाेरी गेलेल्या माेटरसायकल या बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी तसेच नाेकरदारांच्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.