‘सिटी प्राईड रॉयल’च्या स्वच्छतागृहात विनयभंग

रहाटणीतील ‘स्पॉट १८’ या प्रसिद्ध मॉलमध्ये असलेल्या सिटी प्राईड रॉयल सिनेमा चित्रपटगृहाच्या स्वच्छतागृहात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 11 Mar 2023
  • 07:18 am
‘सिटी प्राईड रॉयल’च्या स्वच्छतागृहात विनयभंग

‘सिटी प्राईड रॉयल’च्या स्वच्छतागृहात विनयभंग

रहाटणीतील ‘स्पॉट १८’ मॉलमधील प्रकार, आरोपीचे पलायन

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

रहाटणीतील ‘स्पॉट १८’ या  प्रसिद्ध मॉलमध्ये असलेल्या सिटी प्राईड रॉयल सिनेमा चित्रपटगृहाच्या स्वच्छतागृहात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ९) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तिच्या तक्रारीनुसार, अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिला ही तिचा भाऊ आणि पतीसोबत रहाटणी ‘स्पॉट १८’ मॉलमधील सिटी प्राईड रॉयल सिनेमा या चित्रपटगृहात गुरुवारी दुपारी चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट सुरू होण्यापूर्वी संबंधित महिला स्वच्छतागृहात गेली. त्यावेळी एक अनोळखी पुरुष थेट महिलांच्या स्वच्छतागृहात शिरला. त्यानंतर तो तक्रारदार महिला असलेल्या स्वच्छतागृहातील केबिनच्या दारातून डोकावून पाहात आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रकारामुळे तक्रारदार महिला घाबरली आणि जोरात ओरडली. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला. तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत हा घटनाक्रम नमूद केला आहे.  

‘स्पॉट १८’ मॉलमध्ये तीन मोठे हॉटेल आणि तीन फूड आउटलेट आहेत. तसेच थेटर आणि मॉल असल्याने येथे महिला तसेच मुलींची कुटुंबासह वर्दळ असते.  येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असताना त्याकडे व्यवस्थापनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

या मॉलमध्ये असलेली दोन हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी वाकड पोलिसांकडे यापूर्वी केल्या आहेत. या ठिकाणी शहरातील विविध भागातून युवक-युवतींची गर्दी होत असते. पार्किंग शुल्क आकारण्यावरून या ठिकाणी नेहमी वाद होत असतात. त्यासह येथील थिएटरमधील शुल्क आणि येणाऱ्यांची सुरक्षा यावरून आता ग्राहक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

रूफटॉप हॉटेलना परवानगी नसताना याच मॉलमध्ये दोन मोठे रूफटॉप असून, त्याकडेही पोलिसांचे आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना होताना दिसत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story