पुणे रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात विनयभंग
# पुणे स्टेशन
रेल्वेचा प्रवास केल्यानंतर पतीसोबत पुणे स्टेशन परिसरातून घरी जात असताना भुयारी मार्गात एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत, महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात रविवारी (९ जुलै) पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी २३ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
फिर्यादी महिला रविवारी पहाटे पतीसोबत महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात रेल्वे स्टेशनवर उतरली. तेथून हे दाम्पत्य रेल्वे स्टेशनलगतच्या भुयारी मार्गातून पायी निघाले होते. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून उतरताना महिलेच्या पतीचा पाय घसरला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर अनोळखी तरुणाने महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेचा पती आणि आरोपी तरुणामध्ये झटापट झाली आणि तरुण तिथून फरार झाला. घटनेनंतर महिलेसह तिच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बाहेरगावाहून आलेले अनेक प्रवासी, नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. महिलेच्या विनयभंगाच्या घटनेवरून भुयारी मार्गामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
feedback@civicmirror.in