सचिन माने टोळीवर मोक्का
सीविक मिरर ब्यूरो
पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड सचिन माने आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळताना त्यांच्यावर शुक्रवारी (१०) मोक्काअंतर्गत कारवाई केली.
स्वारगेट आणि परिसरात माने टोळीची प्रचंड दहशत आहे. खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी, हफ्ता वसुली, अवैध शस्त्र बाळगणे, मुलींची छेडछाड अशा प्रकारचे अनेक गुन्हे माने आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत. त्याची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या टोळीचा म्होरक्या सचिन मानेसह १३ जणांवर ही कारवाई केली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही १६ वी कारवाई ठरली.
सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (२७), अजय प्रमाेद डिखळे (२४), यश किसन माने (१८), अमर तानाजी जाधव (२३), विजय प्रमाेद डिखळे (१८), मोन्या ऊर्फ सुरज सतीश काकडे (२६, सर्व रा. गुलटेकडी), निखिल राकेश पेटकर (२२, रा. बिबवेवाडी) आणि एक विधिसंघर्षित बालक तसेच इतर चार साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मागील काळात वरील आरोपींनी गंभीर गुन्हे केलेले असल्याने त्यांच्यावर २०२१ मध्ये एक वर्षाकरिता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. परंतु यातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत खुनाचा प्रयत्न,
गंभीर दुखापत करणे, दहशत माजवून हफ्ते वसुली करणे अशा प्रकारची अनेक कृत्ये केली. गुन्हे शाखा क्रमांक एकचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, परिमंडळ दाेन
पाेलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अशाेक इंदलकर, साेमनाथ जाधव, एपीआय प्रशांत संदे, पीएसआय अशाेक येवले, प्रमाेद कळमकर अंमलदार विजय खाेमणे, सुनीता आंधळे, अनिस शेख, एस. गायकवाड यांच्या पथकाने केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.