गाईंना बेशुद्ध करून चोरणाऱ्या टोळीवर मोक्का

गाईंना भूल देऊन बेशुद्ध करायचे आणि कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका संघटित टोळीला अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यांच्याकडील २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलिसांनी टोळीतील नऊजणांना अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 11:47 am
गाईंना बेशुद्ध करून चोरणाऱ्या टोळीवर मोक्का

गाईंना बेशुद्ध करून चोरणाऱ्या टोळीवर मोक्का

राज्यभर गुन्हे करणारे सर्व आरोपी मुंबईमधील, नऊ जणांना अटक, २५ लाखांचा माल जप्त

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

गाईंना भूल देऊन बेशुद्ध करायचे आणि कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका संघटित टोळीला अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यांच्याकडील २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलिसांनी टोळीतील नऊजणांना अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे. 

ही टोळी राज्यभर कारवाया करत असून वाहतूक करताना गाई नजरेस येतात किंवा त्यांच्या हालचालींमुळे इतरांचे लक्ष वेधले जाते. त्यामुळे गाईंना भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करायचे आणि त्यानंतर त्यांना वाहनातून घेऊन जाण्याची मोडस ऑपरेंडी ही टोळी वापरत होती. बेशुद्ध गाईंना वाहनातून घेऊन जाण्याचे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र या टोळीचा सुगावा लागत नव्हता. अशा वाढत्या घटनांबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे  तक्रार केली होती. तसेच शहरातील वेगवेगळ्या ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या. भटक्या जनावरांसोबतच गोठ्यातील जनावरेही चोरीला गेल्याच्या काही घटना घडल्या असून, याबाबत गोठामालकांनी तक्रारी दिल्या होत्या. मागील चार वर्षांत असे  २० पेक्षा अधिक गुन्हे घडले आहेत. पोलिसांकडून याची दखल घेत ही प्रकरणे तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली होती. सीविक मिररने या घटनेच्या वेळोवेळी बातम्या देऊन असे गुन्हे प्रकाशझोतात आणले आहेत 

पिंपळे निलख, पिपरी कॅम्प, भोसरी, सांगवी तसेच देहूरोड, तळेगाव दाभाडे भागातून जनावरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. जनावरांच्या बेकायदा वाहतूक प्रकरणात पोलीस फिर्यादी होत आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये एकदा जप्त झालेले वाहन पुन्हा वापरल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. भटकी जनावरे हेरून भुलीचे इंजेक्शन देऊन, मोठ्या वाहनांतून उचलून नेली जातात. या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. हे महापालिका आणि पोलिसांचे अपयश आहे. या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाटकर यांनी सीविक मिररला सांगितले होते. हे वृत्त प्रकाशित होताच गोवंश प्राण्यांची हत्या आणि तस्करी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या तपास पथकातील २० कर्मचारी आणि दोन अधिकारी २४ तास शहरात गस्त घालणार आहेत. तस्करींचे हॉटस्पॉट शोधणे, प्राणी तस्करीशी संबंधित गुन्हेगारांवर नजर ठेवणे आणि तस्करी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम या पथकाकडे असेल. या प्रकरणी काय कार्यवाही केली याचा अहवाल दररोज पोलीस आयुक्तांना पाठवला जाणार आहे. ही माहिती पोलीस आयुक्तांनी सीविक मिररला दिली होती. 

पुणे शहर, परिसर, जिल्हा आणि रायगड येथे रात्रीच्या अंधारात भटके प्राणी घेऊन जाण्याचा प्रकार  सुरू आहे. हे काम करणारी मोठी टोळी असून त्यातील एकही आरोपी स्थानिक नाही. टोळीतील सर्व आरोपी मुंबई परिसरात राहणारे आहेत. माहीम, कुर्ला, भाईंदर, मिराज रोड येथून ते रात्री कारमधून पुण्याला येतात. त्यांच्याकडील कारला पुढील दोन सीट असतात. मागच्या बाजूचे सीट काढलेले असते. मुंबईवरून पुण्याला येताना तळेगावच्या आधीच सर्वजण आपले मोबाईल स्वीच ऑफ करायचे. पुण्यात येऊन ते भटकी जनावरे शोधत. जनावरे जवळ येण्यासाठी हिरवा चारा टाकत. चारा खाताना त्याला भुलीचे इंजेक्शन दिले जात असे. बेशुद्ध झाल्यावर त्याला गाडीमध्ये घालून दूर माळरानावर नेऊन हत्या केली जाई. एका प्राण्याचे तीन भाग करून त्याला पुन्हा गाडीत घालून मुंबईला रवाना केले जात असे. हा सारा प्रकार कोणालाही कळायच्या आत वेगाने केला जात असे. दोन तासांमध्ये प्राण्यांना कापून घेऊन मुंबईला जात असत. तेथे ही टोळी प्राण्याचे मांस विकत असे.

अनेक वर्षांपासून चाललेल्या या प्रकाराचा पोलिसांना सुगावा लागला. त्यांनी ठिकठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. टोलनाक्यावरून नेहमी येणाऱ्या गाड्यांची माहिती घेतली. तसेच मोबाईल डाटा तपासला. अडीच महिने पोलिसांनी लक्ष ठेवून टोळीचा माग काढला. पोलिसांनी या टोळीला मुंबईत पकडून शनिवारी पुण्यात आणले. टोळीतील नऊ आरोपींना दिघी पोलीस पथकाने अटक केली आहे. आणखी तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.  त्यांच्याकडील २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींवरील अन्य १४ गुन्हे उघड झाल्याची माहिती दिघी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.    

भारतीय दंड विधान कलम ३८०, ४२९, ४३४ आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) नुसार त्यांच्यावर कारवाई केली आहे. मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोह.अब्दुल रहमान कुरेशी, आश्ररफ सलमान कुरेशी, मोह. आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारुक कुरेशी, राहुल पंडित ऊर्फ राहुल भैया ऊर्फ राहील महंमद कुरेशी, मोशीन शरिफ कुरेशी, जाफर सुजीतकुमार सुभाषचंद्र पाणीगृही (सर्व रा. मुंबई) अशा ९ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील एन्जॉय, इनोव्हा, एक्सिव्ही महिंद्रा ही तीन वाहने जप्त केली असून तसेच गुन्ह्यात वापरलेले कोयते, सत्तूर, नायलॉनच्या दोऱ्या, इंजेक्शन, नंबर प्लेट असा एकूण पंचवीस लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story