दागिन्यांसाठी दगडांची 'मोडस'
सीविक मिरर ब्यूरो
पुण्यात भरदिवसा हातचलाखी करत एका सराफाला तब्बल ५ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. दागिन्यांच्या पाकिटात छोटे दगड ठेवून चोरी करण्याची नवीन मोडस ऑपरेंडी या घटनेतून समोर आली आहे.
या चोरट्याचा सगळा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ६९ ग्रॅमचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता खडक पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
पुण्यातील भवानी पेठ परिसरात असणाऱ्या एका सराफा दुकानात दुपारच्या सुमारास एक पुरुष ग्राहक बनून आला. त्याने आधी एक ग्रॅम सोने खरेदी केले. नंतर त्याने दुकानदाराला आणखी काही दागिने दाखवायला सांगितले. दुकानदाराने त्याला ६९ ग्रॅम दागिने दाखवले. हा पुरुष दागिने बघता बघता बाहेर गेला. त्याने छोटे छोटे दगड आपल्या खिशात टाकून आत आणले. दुकानदाराचे लक्ष नसताना त्याने हळूच दागिने खिशात ठेवले आणि छोटे दगड दागिन्यांच्या पाकिटात टाकले.
दुकानदाराचे त्याच्या या हालचालींकडे लक्ष नव्हते. काही वेळात हा चोरटा फोनवर बोलण्याचे नाटक करत दुकानदारासमोर बसून राहिला. सुमारे पाच मिनिटे फोनवर बोलत असल्याचे भासवत तो दुकानातून निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो दुकानात परत न आल्याने दुकानदाराला संशय आला. दागिन्यांचे पाकीट तपासले असता त्यातील छोटे दगड पाहून चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
ही बाब लक्षात येताच दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. या संदर्भात खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले, ‘‘दुकानदाराच्या तक्रारीनंतर आम्ही संबंधित सराफा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधरे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.