मोदींनी जिंकली मराठी मने
सीविक मिरर ब्यूरो
'इंग्रजांचा विरोध झुगारून सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा अहमदाबादमध्ये बसवला. या स्मारकाचे उद्घाटन महात्मा गांधींच्या हस्ते झाले. मात्र, आता एखाद्या रस्त्याचे नाव बदलले तरी विरोधक हंगामा करतात, त्यांची झोप उडते', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यपाल रमेश बैस, टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला वंदन करून मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. कार्यक्रम राजकीय नसला, तरी विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांवर टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक आणि सावरकर यांचे ऋणानुबंध सांगताना मोदी म्हणाले, 'लोकमान्य टिळक यांच्यात युवकांमधील क्षमता ओळखण्याची दूरदृष्टी होती. याचे एक उदाहरण वीर सावरकरांच्या संबंधित एका घटनेमुळे मिळते. वीर सावरकर युवा असताना टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली होती. सावरकरांनी विदेशात जाऊन शिक्षण घ्यावे आणि परत आल्यावर स्वातंत्र्यासाठी काम करावे, असे टिळकांना वाटत होते. ब्रिटनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा हे मुलासांठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या नावाने शैक्षणिक शिष्यवृत्ती देत असत. टिळकांनी वीर सावरकरांची शिफारस वर्मा यांच्याकडे केली होती. त्यामुळे वीर सावरकर यांनी लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेतले आणि ते बॅरिस्टर झाले. अशाच प्रकारे अनेक युवकांना टिळकांनी घडवले.'
लोकमान्यांच्या आवाहनाला दगडूशेठ यांचा पहिला प्रतिसाद
पंतप्रधान म्हणाले, 'मी इथे येण्याआधी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन गणपतीचे आशीर्वाद घेतले. हे मंदिर पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला आणि सार्वजनिकरित्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.'
पुणे विद्वत्तेची नगरी
पुण्याची कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमीत सन्मानित होणे यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही.'
पुरस्काराची रक्कम 'नमामी गंगे' ला
नरेंद्र मोदी यांना आज ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना लोकमान्य टिळक जे उपरणे वापरायचे अगदी तशाच पद्धतीचे खास उपरणे भेट म्हणून देण्यात आले. लोकमान्य टिळकांची ओळख असलेली खास पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि विशिष्ट अशी ट्रॉफी देण्यात आली, ज्यामध्ये श्रीमद्भगवद्गीता, लोकमान्यांची पगडी, केसरीचा पहिला अंक आणि लोकमान्य टिळकांच्या मूर्तीचा समावेश आहे. तसेच, १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पुरस्काराचा स्वीकार केल्यावर मोदी म्हणाले, 'ज्यांच्या नावात गंगाधर आहे, त्यांच्या नावाने मिळणाऱ्या या पुरस्कारासह मिळणारी रक्कम मी गंगेला समर्पित करत आहे. मी पुरस्कार नमामी गंगे परियोजनासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे.'