मोदींचा पुणे दौरा, लवाजमा आणि कोटींचा खर्च
विजय चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. फोर्स वन कमांडो ते तब्बल ७००० पोलीस पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी एसपीजी, एएसएल या सुरक्षा यंत्रणा आणि राज्य व स्थानिक पोलीस प्रशासन तर होतेच शिवाय गुप्तचर विभागाचे आणि अन्य अधिकारीही दिमतीला होते, मोदींच्या एसपीजी सुरक्षेसाठी सरासरी एका दिवसाला १.१७ कोटी रुपये खर्च होतात, पण जेव्हा असे समारंभ असतात तेव्हा खर्च १० पटीने वाढतो. लोकमान्य पुरस्काराची रक्कम एक लक्ष असली तरी सन्मान मोठा असल्याने २० कोटीहून अधिक रक्कम खर्ची पडली असावी.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र विमानाने आणि हेलिकॉप्टरने आले असले तरी ते स्वतः एका बुलेटप्रूफ कारमध्ये सर्वत्र होते. त्यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये सुमारे १९ गाड्या होत्या. त्यात दोन आर्मर्ड गाड्या, नऊ हायप्रोफाईल गाड्या, रुग्णवाहिका आणि डमी कार्स यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत सुमारे १०० कमांडोंचा विळखाही होता.
सोबत अन्य व्हीआयपी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंडपांसाठी करोडो रुपये मोजण्यात आले. यासोबतच, पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये एक जॅमर गाडीही असते. या गाडीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे रेडिओ किंवा रिमोट कंट्रोल डिव्हाईस जॅम होऊन जातात. रिमोटच्या माध्यमातून होणारे आयईडी बॉम्बहल्ले रोखण्यासाठी ही गाडी फायद्याची ठरते. मोदींसोबत आलेले राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रमुख नेते, अग्निशामक वाहन आणि शासकीय अधिकाऱ्यांची वाहने असे सगळे मिळून हा ताफा सुमारे ३० ते ३५ वाहनांचा झाला होता. पंतप्रधान मोदींना एसपीजी सुरक्षा दिली जाते. यापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही एसपीजी सुरक्षा देण्यात येत होती. मात्र, आता केवळ पंतप्रधान मोदींनाच ही सुरक्षा दिली जाते. २०२०-२१ साली एसपीजीचं वार्षिक बजेट हे ४२९.०५ कोटी रुपये होते. २०२२-२३ मध्ये एसपीजीचे बजेट कमी करून, ३८५.९५ कोटी करण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.