कसबा, चिंचवडमध्ये भाजपला मनसेची साथ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कसब्यातील विजयाबाबत सांशंक असलेल्या भाजपला दिलासा मिळाला आहे. मात्र मनसेच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी शहर काँग्रेसने मनसेवर टीकास्त्र सोडले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 12:54 pm
कसबा, चिंचवडमध्ये भाजपला मनसेची साथ

कसबा, चिंचवडमध्ये भाजपला मनसेची साथ

कसब्यातील भाजपची चिंता मिटली; मनसेच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकास्त्र

#पुणे

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कसब्यातील विजयाबाबत सांशंक असलेल्या भाजपला दिलासा मिळाला आहे. मात्र मनसेच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी शहर काँग्रेसने मनसेवर टीकास्त्र सोडले आहे.  

पोटनिवडणुकीच्या कोणत्याही जागेवर मनसे उमेदवार देत नाही, ही पक्षाची प्रथा आहे. त्यानुसार कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवार न देता भाजपच्या समर्थनार्थ आपली ताकद उभी करण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. भाजप  खासदार गिरीश बापट यांनी आजारपणाच्या कारणास्तव प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढले होते. मात्र आता राज ठाकरेंचे 'सैनिक' भाजपच्या मदतीला धावून जाणार असल्याने उमेदवार हेमंत रासने आणि अश्विनी जगताप निश्चिन्त झाले आहेत. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राज ठाकरे यासंदर्भात मौन बाळगून होते. कसबा आणि चिंचवडमध्ये राज ठाकरे कुणाला पाठिंबा देणार, मनसेची काय भूमिका असणार,  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र राज ठाकरे यांनी भाजपला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.  कसब्यात मनसेची चांगलीच ताकद आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अजय शिंदे अनेक वर्षांपासून तिथे काम करत आहेत. त्यामुळे भाजपला मनसेची मोक्याच्या क्षणी 'मोलाची' मदत होणार आहे. महाविकास आघाडीने तागडे उमेदवार दिल्याने दोन्ही जागांवर अगदी  'काँटे की टक्कर' होणार आहे.  त्यामुळे प्रत्येक मत भाजपसाठी महत्त्वाचे असणार आहे. अशा परिस्थितीत मनसेचे मतदान भाजपसाठी बोनस पॉइंट असेल. कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. भाजपकडून नगरसेवक हेमंत रासने तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे मैदानात आहेत. 

मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीला आणखी जोर लावावा लागणार आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story