काकांची नजर चुकवली; मोदींनी पाठ थोपटली !
सीविक मिरर ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अराजकीय कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमातील सूचक राजकारणाची चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत जाहीर कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमात अजितदादांनी अक्षरश: शरद पवारांची नजर चुकविली. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजितदादांचा हात हातात घेत त्यांच्या पाठीवर हलकेसे थोपटून सलगी दाखवली.
'शरद पवारांचा आदर म्हणून पाठीमागून गेलो'
लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांना भेटणे टाळले अशी चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'पवारांचा आदर म्हणून पाठीमागून गेलो', असे अजित पवार म्हणाले. पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, 'व्यासपीठावरून जाताना मी शरद पवारांच्या पाठीमागून गेलो, तर मला ट्रोल केले जात आहे. परंतु, मी शरद पवार साहेबांचा आदर करतो. ते माझे वरिष्ठ आहेत. त्यामुळे मी त्यांच्या समोरून न जाता पाठीमागून जाऊन माझ्या खुर्चीवर बसलो. मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना अजित पवार म्हणाले, 'मोदी साहेब १८ तास काम करतात. देशासाठी त्यांनी वाहून घेतलेले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झालो आहे. देशातील विकास व राज्यातील विकास झपाट्याने होत आहे.'
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात शरद पवार पंधरा मिनिटे एकटेच व्यासपीठावर बसून होते. पंतप्रधानांच्या ताफ्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आगमन झाले. मोदी, शिंदे आणि फडणवीस तिघांनीही समोर येऊन शरद पवारांशी हस्तांदोलन केले. मात्र, अजित पवार मागच्या बाजूने शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसले. काका-पुतण्याची व्यासपीठावर भेटच झाली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याशीही त्यांनी हात मिळवला. मात्र, पुढे गेल्यानंतर समोर आलेल्या अजित पवारांशी मोदींनी हात तर मिळवलाच, शिवाय त्यांच्या हातावर हलकेच थोपटले. यावर अजित पवार यांनी सूचक हास्यही केले.
शरद पवारांनी पाळला शिष्टाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मान सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीवरून कॉंग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार या कार्यक्रमात काय बोलणार? याबाबतही उत्सुकता होती. मात्र, राजकीय कार्यक्रम नसल्याने शरद पवार यांनी शिष्टाचार पाळला. मोदी किंवा सरकारवर कोणत्याही प्रकारची टीका केली नाही. तसेच मोदी यांच्या कोणत्याही कामगिरीचा उल्लेख केला नाही. 'इंदिरा गांधी, मनमोहन सिंह, बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी यांसह अनेक दिग्गजांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नाव आले याचा विशेष आनंद होतो आहे', असे शरद पवार म्हणाले. पुण्याचे ऐतिहासिक महत्त्व, भोसले घराण्याचे नव्हे, तर हिंदवी स्वराज्याची रयतेचे राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्थापना यावर शरद पवार यांनी भाष्य केले.
'पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांनी केला'
'अलीकडच्या काळात जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याची चर्चा होत आहे. मात्र, लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता आणि तो तळ ठोकून बसला होता, तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी केला होता', असे शरद पवार यांनी सांगितले.
'राज ठाकरेंनी स्वतःचे सांभाळावे'
पवार काका-पुतणे लोकांना वेडे बनवतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, 'कोण काय करते त्यावर काही म्हणण्याचा, टीका करण्याचा त्यांनी काय मक्ता घेतला आहे का? त्यांनी स्वतःचे सांभाळावे. काय चालू आहे, कोण कोणाला वेडं करतं आहे, हे लोक ठरवतील. त्यांनी ठरवण्याची गरज नाही.'