देशातील सर्वांत खोल भूमिगत मेट्रो स्टेशन असलेले शिवाजीनगर स्टेशन लोकार्पणास सज्ज
ओश्विन कढव / अमृता प्रसाद
साडे तीन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आणि कोविडमुळे झालेल्या विलंबानंतर महामेट्रोचे शिवाजीनगरमधील पहिले भूमिगत मेट्रो स्टेशन लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. भूमिगत मार्गामध्ये भारतातील सर्वांत खोल भूमिगत स्टेशनचा दर्जा या स्टेशनला मिळणार आहे त्यामुळे येत्या काळात पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थानकला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. भविष्यात पर्वणी ठरू शकणाऱ्या या स्टेशनची खोली तब्बल ३३.१ मीटर (१०८.५९ फूट) आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या याच भूमिगत मार्गावर दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ आणि मंडई अशी आणखी तीन स्थानके आहेत.
सीविक मिररने बुधवारी या स्थानकाला भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. आधुनिक काळातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या चमत्काराला जवळून अनुभवले.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) सुरक्षितता आणि कार्यक्षमतेवर भर देत या स्थानकाला आकर्षक बनवण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले आणि मराठेशाहीचा दिमाख येथे पाहावयास मिळणार आहे. एकेकडे खास पुणेरी टच आहेच, शिवाय दुसरीकडे, एस्केलेटर (सरकते जीने), सूचना फलक आणि धोक्याची सूचना देणाऱ्या सिग्नलवर बहुविध रंगछटांचा वापर केला जाणार आहे.
या संदर्भात विचारले असता, महामेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन व जनसंपर्क) हेमंत सोनवणे म्हणाले,"आम्हीही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी पाहणी करून आम्हाला हिरवा सिग्नल देताच आम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशन लोकांसाठी लगोलग खुले करुन देऊ."
'सीविक मिरर'च्या टीमने बुधवारी शिवाजीनगर स्थानकाची पाहणी केली. सोनवणे यांनी यावेळी सांगितले की, मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहावी, ही बाब या भुयारी स्थानकात कटाक्षाने पाळली आहे.
हे संपूर्ण मेट्रो स्टेशन सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे. स्टेशनचा प्रत्येक कोपरान् कोपरा आमच्या दृष्टीक्षेपाखाली राहील याची तजवीज केली आहे. केंद्रीकृत नियंत्रण प्रणाली असल्याने कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. स्टेशनवर, मेट्रो डब्याच्या आत, एस्केलेटरवर आणि प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन पॅनिक बटने बसवली आहेत. अग्निसुरक्षेलाही अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तोंड देणे शक्य होईल," अशी माहिती सोनवणे यांनी दिली.
"या शिवाजीनगर स्थानकाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे प्रवासी आणि कर्मचारी यांच्यासाठी चांगल्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइल टॉवर्स बसवण्यात आले आहेत. दिव्यांग लोकांसाठी इथला प्रवास सुलभ आणि सुखकर होईल, याचीही विशेष काळजी घेतली गेली आहे. लिफ्टपासून तिकीट काउंटरपर्यंत आणि ट्रेनमध्ये चढण्यापर्यंत दिव्यांग व्हीलचेअर वापरू शकतात. ज्येष्ठ नागरिक विनासायास किंवा कुठल्याही मदतनिसाशिवाय मेट्रोचा वापर करू शकतील याची आम्हाला खात्री आहे. मेट्रो ट्रेनच्या आत त्यांच्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत,” असे सोनवणे म्हणाले.
मेट्रो स्थानकाबाहेरील प्रवाशांच्या पार्किंगच्या समस्येचे निराकरण करण्यासाठीही विशेष प्रयत्न सुरू आहेत. महामेट्रो पुणे महानगरपालिकेसोबत समन्वयाने काम करत आहे. पार्किंगसाठी वेगळी जागा मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती अधिकाऱ्यानी दिली.
पुणे मेट्रोमध्ये सुमारे ३३.१ किमी लांबीच्या दोन कॉरिडॉरमध्ये पसरलेल्या ३० स्थानकांचा समावेश आहे. पिंपरी -चिंचवड ते स्वारगेट या १७.४ किमी लांबीच्या लाईन-१ मध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट असा सहा किमीचा भुयारी मार्ग आहे. वनाज ते रामवाडी पर्यंत १५.४ किमी लांबीची लाईन-२ एलिव्हेटेड अर्थात पुलावरून जाणारा मार्ग आहे.
शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्टेशनची वैशिष्टये :
दिव्यांग लोकांसाठी विशेष सहाय्य असलेले सर्वसमावेशक मेट्रो स्टेशन. हे स्टेशन शिमला ऑफिस चौकाजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस टर्मिनसच्या खाली आहे.
कृषी महाविद्यालय आणि स्वारगेट दरम्यान सुमारे ६ किमी अंतर कापेल. यात शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पीएमपीएमएल बस स्टॉप आणि एसटी बस डेपोसह एंट्री आणि एक्झिट पॉइंट्ससह मल्टी-मॉडल इंटिग्रेशन आहे. मेट्रो स्टेशनचे आतील सजावट मराठेशाही आणि पेशवाईला समर्पित केलेली आहे. जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि कारकीर्द प्रतिबिंबित करणारे प्रसंग मेट्रो स्टेशनमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.