मध्यरात्रीचा थरार, ५ अटकेत, ४ फरार

शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे प्रमुख आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक आणि अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्तांसह सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा शनिवारी (दि. ८) पहाटे एकच्या सुमारास ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मध्ये सहभागी झाला होता, तर दुसरीकडे याचदरम्यान, वारजे येथे दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीला पकडण्यात गुन्हे शाखा व्यस्त होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sun, 9 Jul 2023
  • 09:38 am
मध्यरात्रीचा थरार, ५ अटकेत, ४ फरार

मध्यरात्रीचा थरार, ५ अटकेत, ४ फरार

एटीएम फोडून पैसे चाेरण्याचा कट गुन्हे शाखेने उधळला, दरोडेखोराच्या शस्त्राच्या वाराने पोलीस जखमी

रोहित आठवले/ अर्चना मोरे

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे प्रमुख आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक आणि अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्तांसह सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा शनिवारी (दि. ८) पहाटे एकच्या सुमारास ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मध्ये सहभागी झाला होता, तर दुसरीकडे याचदरम्यान, वारजे येथे दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीला पकडण्यात गुन्हे शाखा व्यस्त होती. वारजे माळवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे चोरण्याचा कट रचणाऱ्या टोळीला पकडताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

गुन्हे शाखेने कारवाई केली तेव्हा ‘सीविक मिरर’ची टीम घटनास्थळी होती. ‘सीविक मिरर’ ने या ‘मिडनाईट थ्रिल’चे विशेष वृत्तांकन यावेळी केले. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई जवळपास तीन तास म्हणजे पहाटे ४ पर्यंत सुरू होती. सदर घटनेत अमोल लामतुरे (वय ३२, रा. लातूर), राजू शिंदे (वय ३०, रा. ताडीवाला रोड), सचिन खैरे (वय ३०, रा. भूगाव), गणेश खैरे (वय ३२, रा. भूगाव) आणि अक्षय सोळके (वय २२, रा. वारजे) या आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी एका पोलीस हवालदाराच्या पायाला दुखापत झाली आहे.

सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (गुन्हे १), युनिट ३ चे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, फौजदार राहुल पवार आणि त्यांचे कर्मचारी वारजे परिसरात गस्त घालत असताना कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान वारजे पुलाजवळ ही घटना घडली आहे. वारजे पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर म्हाडा वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर पोलिसांना नऊ तरुणांचा जमाव दिसला.  

अंधारात असलेल्या बसस्थानकाजवळ हा गट बसला होता, त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. ‘‘एवढ्या उशिरापर्यंत का थांबला आहात? घरी जा,’’ असे त्यांना सांगून पोलिसांचे पथक टोळक्याच्या दिशेने जात असताना एका आरोपीने थेट पोलिसांवर बंदूक रोखली. बंदूक रोखणारा गोळी झाडण्याच्या तयारीत असतानाच सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी टोळक्याच्या दिशेने गोळीबार केला. त्याच वेळी फौजदार पवार यांनीही आरोपींच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यामुळे आरोपींची पळापळ सुरू झाली. या टोळक्यातील पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अन्य चारजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

या गडबडीत पळून जाणाऱ्यांनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकले. ते लागल्यामुळे पोलीस हवालदार प्रकाश कट्टे यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि अनेक धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या एका पथकाने जखमी सहकाऱ्याला ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त विजय मगर यांनी घटनास्थळी भेट दिली.

‘सीविक मिरर’शी बोलताना पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले, "आरोपींच्या चौकशीत त्यांनी जवळच असलेल्या एटीएममधून रोकड चोरण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. आरोपी लामतुरे याच्यावर दरोडा, चोरी, घरफोडी अशा चार गुन्ह्यांची लातूरमधील गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद आहे, तर शिंदे तसेच सचिन आणि गणेश खैरे यांच्यावरही चोरीच्या प्रत्येकी दोन गुन्ह्यांची नोंद आहे. आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम ३९९, ३०७ आणि ४०२ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.’’ वारजे पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत. यावेळी उपायुक्त झेंडे यांनी ‘सीविक मिरर’च्या टीमला तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनची विशेष माहिती दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने बजावलेल्या कामगिरीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story