स्ट्रक्चरल ऑडिट पत्रास मेट्रोचा नकार

विविध रेल्वे कंपन्यांत मोठ्या पदावर काम करणाऱ्या पुण्यातील चार निवृत्त अधिकाऱ्यांनी, पुणे मेट्रोच्या कामामध्ये असलेल्या गंभीर त्रुटी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिल्या होत्या. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे संकट येऊन जीवितहानी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती. याला आता एक महिना झाला तरीही यावर मेट्रोकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. महामेट्रोने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे असे कळवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 12:51 am
स्ट्रक्चरल ऑडिट पत्रास मेट्रोचा नकार

स्ट्रक्चरल ऑडिट पत्रास मेट्रोचा नकार

पुण्यातील चार निवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांना मेट्रोच्या स्ट्रक्चरल िडझाइन कामात आढळल्या त्रुटी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

विविध रेल्वे कंपन्यांत मोठ्या पदावर काम करणाऱ्या पुण्यातील चार निवृत्त अधिकाऱ्यांनी, पुणे मेट्रोच्या कामामध्ये असलेल्या गंभीर त्रुटी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिल्या होत्या. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे संकट येऊन जीवितहानी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती. याला आता एक महिना झाला तरीही यावर मेट्रोकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. महामेट्रोने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे असे कळवले आहे. परंतु त्याचे कोणतेही प्रमाणपत्र दाखवले नसल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.  

विविध रेल्वे कंपन्यांमध्ये काम केलेल्या आणि मोठा अनुभव असलेल्या पुण्यातील चार निवृत्त अधिकाऱ्यांनी मेट्रो स्थानकांची पाहणी केली. त्यानंतर आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. या अधिकाऱ्यांत हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, सिव्हिल इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट शिरीष खसबरदार आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांचा समावेश आहे. त्यांनी मेट्रोचे काम अत्यंत सुमार झाल्याचे सांगितले आहे. मेट्रो स्थानकाच्या उभारणीचे काम अतिशय सुमार दर्जाचे झाले आहे. स्थानकाचा दर्जा आणि सदोष डिझाइनबाबत तज्ज्ञांनी निरीक्षणे नोंदवित नाराजी व्यक्त केली होती. या सदोष कामांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मेट्रो स्थानकाच्या स्ट्रक्चरमध्ये असलेल्या त्रुटी आणि सुरक्षिततेबाबत या चौघांनी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना पत्र पाठवले होते.  

स्थानकावरील खांब योग्य पद्धतीने उभारलेले नाहीत. दोन खांब जोडले न गेल्याने त्यात अंतर पडले आहे. खांबांची एकसंध जोड न करता काही भाग खांबाच्या बाहेर आला आहे. स्थानकातील असलेल्या स्टीलचे वेल्डिंगचे काम नीट झालेले नाही. तसेच त्यांचे स्क्रू घट्ट न आवळता तसेच सोडून दिलेले आहेत. छतावर काही ठिकाणी राहिलेले भाग जोडण्याचा प्रयत्न केला आहे.  

पुणे शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गरजेच्याच आहेत. पुढील अनेक वर्ष त्यांचा वापर करण्यात येणार आहे. परंतु ज्या बेजबाबदार पद्धतीने तिचे काम झालेले आहे हे धक्कादायक आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. चक्रीवादळ, जोराचा पाऊस आणि वारा अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्यामध्ये हे सुमार दर्जाचे काम किती प्रमाणावर तग धरेल याची शंकाच आहे, असे नारायण कोचक यांनी सांगितले. असे अपघात घडू नयेत. परंतु त्यासाठी प्रार्थना करून चालत नाही, तर योग्य पद्धतीने काम करावे लागते. अशा बेपर्वाईमुळे जर अपघात झालाच तर त्याचा दुहेरी फटका बसू शकेल. 

मेट्रोच्या खालून रस्ता आहे. त्यावरूनही नेहमी वाहतूक चालू असते. स्थानकातील स्टीलचा काही भाग निसटून खाली पडला तर खालील वाहनचालकांचा प्राण जाण्याची शक्यता आहे. कोणतेही स्ट्रक्चर पुढील शंभर वर्षासाठी बांधलेले असते. मात्र मेट्रोचे काम सुमार दर्जाचे झाले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मेट्रोला पत्र पाठवले आहे. याला एक महिना झाला तरीही त्यांच्याकडून अजूनही उत्तर आलेले नाही. 

मेट्रोने प्रवास करत असताना या चार अनुभवी इंजिनिअरांना कामात अनेक त्रुटी आढळल्या. त्यांनी फोटो पाठवून या बाबी महामेट्रोच्या निदर्शनास आणून दिल्या. एक महिन्यापूर्वी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्राद्वारे कळवण्यात आलेल्या गोष्टीला मेट्रोने गांभीर्याने न घेता प्रतिसाद दिला नाही. या त्रुटी पाहता पुणेकरांचा जीव धोक्यात घालून मेट्रोचे काम चालू आहे. पुणे मेट्रोने आजपर्यंत केलेल्या सर्व कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी या तज्ज्ञांनी केली होती. "मेट्रोकडून झालेल्या चुका लक्षात घेऊन त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. महामेट्रोने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. मेट्रो पूर्णपणे सुरक्षित असून त्याच्या कामात काहीच धोका नाही, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महामेट्रोने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे असे त्यांनी आम्हाला लेखी कळवले आहे. परंतु त्याचे कोणतेही प्रमाणपत्र आम्हाला दाखवले नाही. आम्ही आतापर्यंत याच क्षेत्रात असल्याने मेट्रोच्या कामातील चुका डोळ्यांनी पाहिल्या आहेत. एवढ्या चुका असतानाही ते सुरक्षित आहे असे ते म्हणतात. असे असेल तर असेच डिझायनिंग करून घेतले होते का, अशी शंका उपस्थित होत आहे असे कोचक म्हणतात. 

पुणे मेट्रो हा शहरातील मोठा प्रकल्प आहे. त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असेल तर या कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सक्षमतेबाबत  देखील प्रश्नचिन्ह तयार होते. समोर आलेल्या चुका टाळून कामे रेटू नये. त्यामध्ये सुधारणा करावी. पुढे कालांतराने अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलचे नितीन कदम यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story