संगमवाडी परिसरातून १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त
#येरवडा
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने येरवड्यातील संगमवाडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून १४ लाख रुपये किमतीचे ७० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
अली शेर लालमोहमद सौदागर (वय ६१, रा. संगमवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थविरोधी पथकातील कर्मचारी संगमवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन जगदाळे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी सौदागरला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे ७० ग्रॅम मेफेड्रोन सापडले. त्याच्याकडून मेफेड्रोन आणि मोबाइल संच असा एकूण १४ लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, रवींद्र रोकडे, चेतन गायकवाड, संदीप जाधव, महेश साळुंखे, दिशा खेवलकर आदींनी ही कारवाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.