मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
#चंदननगर
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर करडी नजर असणाऱ्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आंतरराज्य अमली पदार्थ विकणाऱ्यांकडून २ कोटी २१ लाख रुपये किमतीचे १ किलो १०८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना अटकही केली आहे. यातील आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे.
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पिंपळखेडी येथील ३५ वर्षीय आझाद शेरजमान खान, १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आणि त्याच जिल्ह्यातील ३५ वर्षीय नागेश्वर रामेश्वर प्रजापती अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना २९ एप्रिलच्या रात्री २ कोटी २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे एक किलो १०८ ग्रॅम मेफेड्रोनसह पकडण्यात आले आहे. रतलाम ते खराडी बस स्टॉप या खासगी बसमध्ये ते प्रवास करत होते. पोलीस शिपाई मनोजकुमार साळुंखे आणि मारुती पारधी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी चौक ते रक्षकनगर, स्नेहदीप सोसायटीजवळ सापळा रचून आरोपींना दारूसह ताब्यात घेतले आहे. अमलीपदार्थांसोबतच पोलिसांनी चार मोबाईल फोन, रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक लाल रंगाची सॅक बॅग जप्त केली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त रतेश कुमार आणि पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांची अमली पदार्थ विकणाऱ्या टोळीवर करडी नजर आहे. यापूर्वी त्यांनी अशीच कारवाई करत पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून मेफेड्रोन जप्त केले होते.
दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली होती. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे १२ लाख रुपये एवढी होती. पोलिसांनी या कारवाईत अमली पदार्थ तस्कराला अटक केली. महंमद फारुख महंमद उमर टाक असं अटक केलेल्या तस्कराचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा होता. पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात एक इसम येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे शाखेने सापळा रचला. पाठीला सॅक लावलेला एक तरुण फुटपाथवर संशयास्पद रेंगाळताना दिसला. साध्या वेशातील पोलिसांनी महंमद टाक याला ताब्यात घेतले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.