जादूटोण्यासाठी विकले मासिक पाळीचे रक्त
सीविक मिरर ब्यूरो
एका महिलेचे मासिक पाळीचे रक्त जादूटोण्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी म्हणवणाऱ्या पुण्यामध्ये घडला आहे.
पीडित महिला विवाहित असून सासरच्या मंडळींनीच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी या २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्याआधारे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. २ वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली.
सासरकडील माणसे पीडित महिलेच्या मासिक पाळीदरम्यान तिचे हातपाय बांधून ठेवत आणि तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून गोळा करीत. हे रक्त जादूटोण्यासाठी ५० हजार रुपयांत विकल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना या महिलेने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
ज्या दिवशी ही महिला पोलिसांकडे आली, त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच हे अघोरी कृत्य बीडमध्ये घडलं असून पुढचा तपास बीड पोलिसांकडे पाठवण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
पोलीस म्हणाले, “पीडित महिला ज्या दिवशी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला आली, त्याचदिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. कदाचित बीडमध्ये सासरी स्थानिक पोलिसांकडे गेली असावी. याबाबत आम्हाला अधिक माहिती नाही. हा गुन्हा बीडमध्ये घडला आहे. त्यामुळे आम्ही हा गुन्हा दाखल करून घेऊन याचे कागदपत्र बीड पोलिसांकडे तपासासाठी पाठवले आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.’’ पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, कलम ३७७, कौटुंबिक त्रासासाठी कलम ४९८ आणि अघोरी कृत्य केल्याप्रकरणी त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेवर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश दिले,” अशी माहिती चंद्रकांत
पाटलांनी दिली.