सात हजार पोलिस घराच्या प्रतीक्षेत
पुण्यातील लोहगाव येथे महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सह. गृहनिर्माण संस्था मर्यादित अंतर्गत सुरू असलेले काम रखडल्यामुळे ७ हजार पोलीस कर्मचारी घराच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील लोहगाव येथे महाराष्ट्र पोलिस मेगा सिटी उभारण्याचे २००९ साली ठरवले होते. मात्र, अद्यापही काम पुर्ण न झाले नसून यात सुमारे २७५ कोटींचा घोटाळा आहे, हा प्रकल्प महाराष्ट्र शासनामार्फत पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे ही पोलिसांसाठी मेगा सिटी की मेगा घोटाळा आहे ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
याबाबत माजी पोलिस अधिकारी मदन पाटील, नरेंद्र मेघराजानी यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, २००९ मध्ये हा प्रकल्प ११६ एकर जागेवर सातमजली इमारतींचा होणार, असे सभासदांना कळविण्यात आले. यासाठी लागणारा फंड सभासदांच्या माध्यमातून जमा देखील करण्यात आला होता.
हा प्रकल्प उभारण्यासाठी बी. ई. बिलिमेरिया या कंपनीस कंत्राट देण्यात आले होते. परंतु विकासकाने ठरलेल्या वेळेत बांधकाम पूर्ण न करता आजपर्यंत घरे बांधून दिली नाही. यात महाराष्ट्रातील सात हजार पोलिसांचे सुमारे ५२५ कोटी रुपये अडकले आहेत. तर जवळपास २७५ कोटींचा घोटाळा आहे. त्यामुळे, संस्थाचालक कंत्राटदारांच्या व्यवहाराची महारेरा सहकार व आर्थिक गुन्हे अन्वेषण मार्फत शासकीय यंत्रणेद्वारे चौकशी करण्यात यावी. हा प्रकल्प महाराष्ट्र शासन मार्फत पूर्ण करण्यात यावे, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.