‘मायेची सावली हरवली, पण माया कायम’

सध्याच्या काळात घरात बोलायला माणसं मिळत नाहीत, संवाद कमी होत चालला आहे. आम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती, जुळून आलेली नाती जास्त जवळची वाटतात. हृदय जिंकून नाती जपणं हे काम मोठी लढाई जिंकण्यापेक्षाही सर्वात मोठं काम आहे. आज पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ हयात नाहीत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Mon, 7 Aug 2023
  • 11:08 am
‘मायेची सावली हरवली, पण माया कायम’

‘मायेची सावली हरवली, पण माया कायम’

सिंधुताईंच्या लेक-जावयांनी अधिक मासाच्या कार्यक्रमात घेतला सहभाग, ममता बाल सदनमध्ये रंगला मेळावा

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

सध्याच्या काळात घरात बोलायला माणसं मिळत नाहीत, संवाद कमी होत चालला आहे. आम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती, जुळून आलेली नाती जास्त जवळची वाटतात. हृदय जिंकून नाती जपणं हे काम मोठी लढाई जिंकण्यापेक्षाही सर्वात मोठं काम आहे. आज पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ हयात नाहीत. ईश्वराने आमच्याकडून मायेची सावली हिरावून घेतली, पण आम्हा सर्वांचे  मायेचे छत्र अजूनही कायम आहे, अशी भावना सिंधुताईंच्या लेक-जावयांनी अधिक मासाच्या वाण कार्यक्रमात रविवारी व्यक्त केली.

अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या ममता बाल सदन कुंभारवळण (सासवड) या अनाथ आश्रमात "अधिक मासाचे वाण माईंच्या लेकी व जावयांना दान" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. अनिल वांढेकर, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. विनायक बांदेकर, ममता सपकाळ, विनयभाऊ आदी उपस्थित होते. या प्रसंगी माईंच्या ३६ लेकी व जावयांना कुमकुम तिलक लावून औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांना संपूर्ण पोशाख, साडीचोळी, तांब्याचा लामणदिवा, चांदीचे जोडवे, ३३ अनारसे, तांब्याचे निरंजन वाण रूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले.

ममताताई यांनी 'आज माई आपल्यात नाहीत, पण आम्हाला तिची उणीव भासत असली तरी बापमाणूस म्हणून दीपकदादा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माईंनंतर तिच्या परिवारासाठी तूच खरा आधारस्तंभ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सेवा काय असते, हे आम्ही माईंकडून शिकलो, आम्हाला सेवा करायची संधी मिळाली, त्यासाठी आम्ही ममता बाल सदनचे आभारी आहोत, असे डॉ. वाघोलीकर आणि डॉ. बांदेकर यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड म्हणाले की, मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करते कळत नाही. त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. या वेदनेतून मिळणारा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. माझ्या मनाला प्रचंड समाधान देते, माईंचे पावन कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काम करण्याची ऊर्जा देते, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माईंच्या कार्याचा व समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जात राहीन. आज नाती तुटत आहेत, तुटणाऱ्या नात्यांची वीण मला एका धाग्यात घट्ट विणायची आहे. त्यातूनच एक विशाल कुटुंब निर्माण करायचं आहे, अशा भावना गायकवाड यांनी व्यक्त केल्या. 

उपस्थित अतिथींच्या हस्ते लेकी आणि जावयांचे विधिवत पूजन करण्यात आले. संस्थेत लहानाच्या मोठ्या झालेल्या व लग्न लावून सासरी सुखाने संसार करीत असलेल्या माईंच्या लेकी अनेक वर्षांनी दोन दिवस मुक्कामाला आल्याने ममता बाल सदन गजबजून गेले होते. काही लेकी तर आपल्या लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या. चिमुकल्या मुलींचा आनंद गगनाला भिडला होता. आपल्या मोठ्या बहिणी आल्या याचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story