आवारे खुनाचा 'मास्टर माईंड' अटकेत
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
किशोर आवारे यांच्या खुनामागील मास्टर माईंड माजी नगरसेवक चंद्रभान विश्वनाथ ऊर्फ भानू खळदे याला ५६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने (गुंडा स्कॉड) नाशिकमधून भानू खळदेला ताब्यात घेतले.
जनविकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचा १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या तात्पुरते कार्यालय असलेल्या इमारतीत गोळ्या झाडून आणि डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी या घटनेनंतर अवघ्या काही तासांत मारेकरी शाम निगडकर, प्रवीण धोत्रे, आदेश धोत्रे, संदीप मोरे, श्रीनिवास शिडगल यांच्यासह मनीष यादव आदी रेकॉर्डवरील सराईतांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणात आवारे यांच्या खुनाची सुपारी दिली म्हणून भानू खळदे याच्या मुलाचे नाव पुढे आल्याने गौरव चंद्रभान खळदे (वय २९) याला काही दिवसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणात १५ वर्षे तळेगाव दाभाडे परिसरात नगरसेवक राहिलेला भानू मात्र फरार होता.
दरम्यान, भानूच्या परवानाधारक पिस्तुलाची काडतुसे चोरीला गेल्याचेही तपासात उघड झाले होते. तर, आरोपींनी अन्य काही पिस्तूल आणि काडतुसे विकत आणून खून केल्याचे उघड झाले होते. परंतु, या प्रकरणात किशोर आवारे यांच्या मातोश्री आणि माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे यांनी फिर्याद देताना राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचा भाऊ सुधाकर यांच्यासह अन्य दोघांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप केला होता. मात्र, तपासात ज्यांची नावे पुढे येतील त्यांनाच अटक केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर भानू खळदे ५६ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
आवारे खुनाचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. यासह गुंडा स्कॉड, गुन्हे शाखा युनिट पाच आणि अन्य गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर होती, तर दुसरीकडे आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या नावाखाली, आवारे यांचा जवळचा सहकारी म्हणून मावळ पट्ट्यात परिचित असलेला प्रमोद सांडभोर या सराईताने टोळी उभी करून आमदार शेळके यांच्या भावाच्या खुनाचा कट रचल्याची बाबही उघड झाली होती. त्यामुळे एकूणच आवारे प्रकरणात अन्य कोणाची नावे पुढे येतात याबाबत मावळसह संपूर्ण राज्यात उत्सुकता पसरली आहे. आवारे यांनी भानूच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मनात असल्याने गौरव खळदेने आवारे यांच्या खुनाची सुपारी देऊन हा सर्व प्रकार घडवून आणल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. परंतु, इंजिनिअर गौरवला अटक केल्यानंतर भानू फरार झाला होता. त्यानंतर तो खंडाळा, दौड, हैदराबाद आणि नाशिक जिल्ह्यातील सिंधी कॉलनीत वास्तव्याला असल्याची माहिती गुंडा स्कॉडचे प्रमुख व साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने यांना समजली होती.
प्रवीण तापकीर, सोपना ठोकळ, शुभम कदम हे पोलीस कर्मचारी खळदेचा तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पाठलाग करीत होते. भानू नाशिक येथे वास्तव्याला आल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या उपायुक्त स्वप्ना गोरे, साहाय्यक आयुक्त सतीश माने, साहाय्यक निरीक्षक माने यांच्यासह पथकाने खळदेला अटक केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.