हिंजवडीत मौसम मस्ताना, पण कोंडीच असताना
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पावसाला सुरुवात होताच आयटी पार्क हिंजवडीमधील वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा एकदा तीव्रतेने जाणवू लागली आहे. एकेरी वाहतूक सुरू असतानाही विरुद्ध दिशेने येणारी वाहने, मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात आलेली एक लेन आणि प्रामुख्याने येथील रस्त्यांची दुरवस्था यामुळे कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. दिवसेंदिवस जटील होत असलेल्या या समस्येबाबत आयटीयन्सने 'ट्विटर'वरही संताप व्यक्त केला आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हिंजवडीत भर पावसात दुचाकीस्वारांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. येथील कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी चक्राकार वाहतूक पद्धतीचा अवलंब काही वर्षांपूर्वी केला. त्यानंतर भूमकर चौक ते विनोदवस्ती आणि परिसरात एकेरी वाहतूक सुरू केली. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटली, पण आता त्याला होत असलेल्या राजकीय विरोधामुळे पोलिसांची कुचंबणा होत आहे.
दुसरीकडे हिंजवडीमधून पुणे-बंगळुरू महामार्गावर येण्यासाठी असलेल्या प्रत्येक अंडरपासमध्ये पाणी साठत आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम गेल्या वर्षभरापासून या भागात सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची एक लेन बंद करून कामकाज केले जात आहे. कोरोना कालावधी आणि त्यानंतरही अनेक दिवस आयटीयन्स घरून काम (वर्क फ्रॉम होम) करीत होते. पण आता कंपन्यांनी आयटीयन्ससह अन्य कामगारांना कंपनीत येण्यास सांगितल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू असताना या वाहनांच्या रांगा आता लागत आहेत.
मेट्रोने पोलिसांच्या मदतीला येथील वाहतूक नियमानासाठी वॉर्डन दिले आहेत. त्याचबरोबर हिंजवडी आयटी असोसिएशनकडूनही वॉर्डन देण्यात आले असून, कोंडी फोडण्यासाठी येथील रस्त्यांची स्थिती सुधारण्याची गरज आहे. हिंजवडी फेज १-२ मधून भूमकर चौकमार्गे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी एक ऑटोमेटेड् सिग्नल सीस्टिम बसविण्यात आली आहे. ज्या दिशेला वाहनसंख्या अधिक असेल तिकडे सिग्नल हिरवा होऊन वाहने पुढे मार्गस्थ केली जात आहेत. परंतु, पावसाचे पाणी अंडरपासमध्ये साठल्यावर वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहनांचा रांगा लागत आहेत.
आयटीपार्क - हिंजवडीतून बाहेर येण्यासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ आता लागत आहे. पावसामुळे झालेली रस्त्यांची दुरवस्था सुधारण्यासाठी पीएमआरडीएकडून काय दिले गेले आहे. निदान अंडरपासमधील प्रश्न सोडविण्यासाठी काही तरी कायम स्वरूपाचा तोडगा निघण्याची गरज आहे. वर्क फ्रॉम होम असताना काम व्यवस्थित होत होते. आता पावसाळ्यात कोंडी वाढत असल्याने पुन्हा वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळावी यासाठी मागणी होऊ लागल्याचे 'फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज'चे निमंत्रिक पवनजीत माने यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.