लोहगावात रोखला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विवाह
# वडगाव शेरी
विद्येच्या माहेरघरात शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोहगाव येथील एका सावित्रीच्या लेकीचा बालविवाह सामाजिक कार्यकर्तीच्या जागरुकतेमुळे आणि धाडसामुळे रोखला गेला. बालकल्याण समिती आणि विमानतळ पोलिसांच्या तत्परतेमुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले. ही बालिका इयत्ता नववीत शिक्षण घेत असून तिला शिकण्याची इच्छा आहे.
याबाबत बालकल्याण समिती सदस्य आनंद शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा गादिया यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांना दूरध्वनी करून लोहगाव येथील एका चौदा वर्षीय बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेवरून बालकल्याण समिती सदस्य वैशाली गायकवाड, आनंद शिंदे, श्यामलता राव, पूर्वी जाधव यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधला. बालविवाह नियोजित असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने यांनी तत्परता दाखवीत जागेवर जाऊन माहिती घेत हा बालविवाह रोखला.
पोलीस निरीक्षक सोंडे म्हणाले, बालिकेस ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात आले. तसेच मुलीच्या पालकांनाही नोटीस देण्यात आली आहे. बाल कल्याण समिती सदस्य आनंद शिंदे म्हणाले, समितीने बालिकेस तात्पुरते संस्थेत ठेवण्याचे आदेश देऊन बालिकेस सुरक्षित केले. मुला-मुलींचे दर हजारी प्रमाण व्यस्त होत चालल्याने बालविवाह रोखण्याचे मोठे आव्हान बालकल्याण समिती आणि पोलिसांसमोर आहे.
समाजानेही जागृत राहून असे बालविवाह रोखावेत. मुलीच्या आई-वडिलांना समुपदेशन करण्यात येणार आहे. कायदा असूनही समाजात आजही बालविवाह होतात. हे खरे तर दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा घटना थांबवण्यासाठी शाळा, वस्ती आणि गावागावात जनजागृती आणखी प्रभावी करावी लागेल. तेव्हाच बालविवाहाला बळी पडणाऱ्या मुली न भिता समोर येऊन विरोध करतील, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा गादिया यांनी व्यक्त केली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.