मंत्र्यांना उद्घाटनांचे व्यसन, चालू केंद्राचे वर्षाने लोकार्पण

ससून रुग्णालयात गुरुवारी व्यसनमुक्ती सुविधा केंद्राचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र हे केंद्र प्रत्यक्षात वर्षभरापूर्वीच सुरू झाले असून आतापर्यंत दोन ते अडीच हजार जणांचे समुपदेशन व अनेकांवर उपचारही करण्यात आले आहेत. मंत्रालय व नॅशनल ड्रग डिपेंडेंस ट्रीटमेंट सेंटरच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाते. अद्याप त्याचे अधिकृतपणे लोकार्पणच झाले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी हा कार्यक्रम घेण्यात आला असून केंद्र सुरू झाल्याचा फलकही आजच्या तारखेचा लावण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 10 Feb 2023
  • 02:59 pm
मंत्र्यांना उद्घाटनांचे व्यसन, चालू केंद्राचे वर्षाने लोकार्पण

मंत्र्यांना उद्घाटनांचे व्यसन, चालू केंद्राचे वर्षाने लोकार्पण

ससून रुग्णालयाच्या व्यसनमुक्ती केंद्राचा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाला पुन्हा शुभारंभ

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

ससून रुग्णालयात गुरुवारी व्यसनमुक्ती सुविधा केंद्राचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र हे केंद्र प्रत्यक्षात वर्षभरापूर्वीच सुरू झाले असून आतापर्यंत दोन ते अडीच हजार जणांचे समुपदेशन व अनेकांवर उपचारही करण्यात आले आहेत. मंत्रालय व नॅशनल ड्रग डिपेंडेंस ट्रीटमेंट सेंटरच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाते. अद्याप त्याचे अधिकृतपणे लोकार्पणच झाले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी हा कार्यक्रम घेण्यात आला असून केंद्र सुरू झाल्याचा फलकही आजच्या तारखेचा लावण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाअंतर्गत व्यसनमुक्ती सुविधा केंद्राचे कामकाज चालते. मनोविकृती समुपदेशन केंद्राच्या आवारातच व्यसनमुक्तीबाबतही समुपदेशन व मार्गदर्शन केले जाते. व्यसनी व्यक्तींवर आवश्यकतेनुसार उपचारही केले जातात. त्यांना महागडी औषधे केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत मोफत दिली जातात. गरज भासल्यास काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेत उपचार सुरू ठेवले जातात. मागील वर्षभरापासून या केंद्राचे कामकाज सुरू असून जवळपास दोन ते अडीच हजार जणांनी आतापर्यंत केंद्रात येऊन मार्गदर्शन घेतले आहे. त्यामध्ये तरुणांपासून विविध वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.

याच केंद्राचे गुरुवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. नशामुक्त भारत अभियानांतर्गत देशभरात अशी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या केंद्राचे केंद्रीय मंत्र्यांनी लोकार्पण केल्याने रुग्णालयात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. कार्यक्रमानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही नाव आहे. प्रत्यक्षात ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. तसेच फलकावर लोकार्पणाची तारीख ९ फेब्रुवारी अशीच आहे. त्यामुळे केंद्राने मागील वर्षभर केलेल्या कामाचे काय, असा सवालही केला जात आहे.

व्यसनमुक्ती केंद्राविषयी नोडल अधिकारी डॉ. निशिकांत थोरात म्हणाले, हे केंद्र केंद्रीय सामाजिक न्याय विभाग आणि एनडीडीटीसी, एम्सच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. अद्याप या केंद्राचे अधिकृतपणे लोकार्पण झाले नव्हते. हा कार्यक्रम गुरुवारी झाला. मात्र मागील वर्षभरापासून केंद्र सुरू असून दोन ते अडीच हजार जणांनी मार्गदर्शन घेतले आहे. प्रामुख्याने मद्यपान आणि तंबाखूचे व्यसन असलेले रुग्ण अधिक प्रमाणात येतात. त्याचप्रमाणे गांजा, ब्राऊन शुगर व इतर व्यसने असलेले रुग्णही असतात. केंद्रातील मार्गदर्शन व उपचारांचा अनेकांना फायदा झाला आहे. आवश्यकतेनुसार त्यांना मनोविकृती विभागांतर्गत रुग्णालयात दाखल करून घेत उपचार केले जातात. हे प्रमाण १० ते १५ टक्के एवढेच आहे. इतरांवर मोफत औषधोपचार केले जातात.  

दरम्यान, व्यसनमुक्ती सुविधा केंद्राचे लोकार्पण केले असले तरी केंद्रासाठी स्वतंत्र कार्यालय किंवा जागाही नाही. वर्षभरापासून केंद्र मनोविकृतीशास्त्र विभागातच सुरू आहे. तिथेच बाह्यरुग्ण विभागामध्ये सोमवार ते शनिवारी येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन केले जात आहे. या ठिकाणी इतर मानसिक आजार असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईकही येत असतात. त्यांच्यासोबत व्यसनी रुग्णांचेही समुपदेशन केले जाते. हा विभाग हेरिटेज इमारतीत आहे. त्यामुळे तशीही तिथे जागा अपुरी आहे. सध्या या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story