व्यवस्थापन कोट्यातील हेराफेरी चौकशीच्या फेऱ्यात
यशपाल सोनकांबळे
TWEET @YashPune_Mirror
कॅप राऊंड पूर्ण होण्यापूर्वीच व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोट्यातून महाविद्यालयांनी दिलेल्या प्रवेशांची चौकशी होणार आहे. खासगी व्यावसायिक महाविद्यालयांची छाननी होणार असून अनियमितता आढळल्यास असे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिला आहे.
खासगी व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेतून (सीईटी) प्रवेश दिले जातात. या प्रवेशाच्या सगळ्या फेऱ्या संपल्यावर व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश होतात. मात्र, अनेक महाविद्यालयांनी या फेऱ्या संपण्यापूर्वीच व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश दिले. काही ठिकाणी ‘अर्थ’ पूर्ण उलाढाल झाल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. पालक आणि विद्यार्थी संघटनांच्या तक्रारीनंतर सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी या महाविद्यालयांची छाननी करण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या महाविद्यालयातील प्रवेश बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यास ते नियामक प्राधिकरणाच्या स्तरावर रद्द केले जातील, असे डीटीईच्या संचालकांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
सीईटी सेलच्या नियमानुसार सीएपी (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) फेऱ्यांनंतर संस्था स्तरावरील कोट्यातील प्रवेश देणे अनिवार्य आहे. वारभुवन यांनी ‘मिरर’ शी बोलताना सांगितले की, दोन्ही कॅप फेऱ्यांचे निकाल प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. संबंधित महाविद्यालयाची निवड यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर लावणेही अनिवार्य आहे. त्यामुळे एक विशेष समिती व्यवस्थापन कोट्यातील सर्व प्रवेश, जाहिराती आणि गुणवत्ता यादीची छाननी करेल. प्रवेश प्रक्रियेत कोणतेही महाविद्यालय नियमांचे उल्लंघन करताना दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सर्व बेकायदेशीर प्रवेश रद्द केले जातील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.