थेट ‘एलओसी’वर महाराज देणार प्रेरणा
विजय चव्हाण
प्रतिकूल परिस्थितीत शत्रूशी दोन हात करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना स्फूर्ती मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर बसवण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यात येणार आहे.
शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांनी जोपासलेल्या नैतिक मूल्यांमधून दररोज प्रेरणा मिळावी, तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी 'आम्ही पुणेकर' संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यात येणार आहे. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.
जाधव म्हणाले, मार्च महिन्याच्या अखेरीस पुतळा बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांवरील माती आणि पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे. शिरोळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने शत्रूंना पळवून लावले. त्यांच्या गनिमी काव्याचा आदर्श जगभरातील विविध देशांनी घेतला आहे. सीमेवरील भारतीय जवानांना शिवरायांचा आदर्श आणि त्याद्वारे स्फूर्ती मिळावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भारत-पाकिस्तान सीमेवर स्थापन करण्यात येत आहे.
याआधी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जून २००९ रोजी राज्यपाल जे. जे. सिंग यांच्या हस्ते ‘अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारका’चे उद्घाटन करण्यात आले होते. एवढेच नाही तर तवांग ते बुम्ला या २२ किलोमीटर मार्गाला ‘छत्रपती शिवाजी मार्ग’ असे नावही देण्यात आले. तवांगमधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे. हा रस्ता म्हणजे भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे. संरक्षणदृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. सीमेवरील सैनिकांना जलद रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता. मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २ हजार जवानांनी उणे ३० अंश सेल्सियस तापमानात काम करून केवळ पाच महिन्यात हा बावीस किलोमीटरचा मार्ग तयार करून दाखवला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.