‘महाज्योती’च्या परीक्षेवर गैरव्यवहाराची काजळी
यशपाल सोनकांबळे
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत (महाज्योती) एमपीएससी परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेतच गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाज्योती आणि खासगी क्लासचालकांचे साटेलोटे झाले असून परीक्षेतील बहुतांश प्रश्न हे खासगी क्लासच्या सराव प्रश्नप्रत्रिकेतील आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती अशी की महाज्योतीतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण दिले जाते. एक हजार जागांसाठी चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थी इच्छुक होते. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी आलेले बहुतांश प्रश्न एका खासगी क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेतीलच आले होते. त्यामुळे खासगी क्लासनेच पेपर तयार केला असल्याची शंका विद्यार्थ्यांना आली. महाज्योतीच्या ई-मेलवर याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश 'महाज्योती'चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिले आहेत. तक्रारींची दखल घेऊन लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबाबत एमपीएससीचे परीक्षार्थी नितीन आंधळे म्हणाले, "महाज्योतीच्या एमपीएससी प्रशिक्षण योजनेच्या १,००० जागांसाठी ही ऑनलाइन परीक्षा ३० जुलै २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यातील एकूण ४०,००० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. या परीक्षेसाठी एकूण १०० प्रश्न आणि २०० गुण होते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना १०,००० रुपये मासिक भत्ता मिळेल. मात्र 'महाज्योती'तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याच कोचिंग क्लासेसच्या सराव प्रश्नपत्रिकेतील बहुतांश प्रश्न आले होते. त्यामुळेच साहजिकच त्या क्लासच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार होता.
स्टुडंट्स हेल्पिंग हँडचे संस्थापक कुलदीप आंबेकर म्हणाले, "काही निवडक खाजगी आयटी कंपन्या आणि खाजगी कंत्राटदार महाज्योतीमध्ये गैरव्यवहार आणि बेजबाबदार काम करत आहेत. हे टेंडर वेशाइर्न टेक प्रायव्हेट लिमिटेडकडे होते. मग त्यांनी ज्ञानदीप अकादमीच्या सराव प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने ४०,००० उमेदवारांना कशा वितरित केल्या? ही इच्छुक उमेदवार, महाज्योती आणि महाराष्ट्र राज्य सरकारची फसवणूक आहे. या आयटी कंपनीला काळ्या यादीत टाकून फेरपरीक्षा घेण्याची आमची मागणी आहे.."
'महाज्योती'चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले म्हणाले, "काही उमेदवारांनी ९० टक्के प्रश्न खासगी कोचिंग क्लासच्या प्रश्नपत्रिकांसारखेच असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ऑनलाइन परीक्षा आयोजित करणाऱ्या वेशाइन टेक प्रायव्हेट लिमिटेडकडून स्पष्टीकरण मागितले. महाज्योतीच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्याला सखोल चौकशी करून महाज्योती नागपूर मुख्यालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात ज्ञानदीप अकादमीच्या मुद्द्यावर लेखी खुलासा मिळाला आहे. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.