कबड्डी
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
पुण्यासह राज्यातील आठ वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा दणक्यात पार पडली. यात पुणे जिल्हा संघाने ११६ सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावले. मात्र, क्रीडानगरी म्हटली जाणारी पुणे महापालिका खेळाडूंना मदत करण्याबाबत किती उदासीन आहे, याचे अस्सल उदाहरण समोर आले आहे. पालिकेने चार वर्षांपूर्वी धोरण तयार करूनही खेळाडू दत्तक योजनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. तसेच दोन वर्षांपासून खेळाडूंना शिष्यवृत्तीही देण्यात आलेली नाही. यामुळे पालिकेच्या कार्यतत्परतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यामध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे अनेक खेळाडू आहेत. अनेकांनी पुण्याचे नाव उंचावले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईपाठोपाठ खेळाडू घडविण्यात पुण्याचाच क्रमांक लागतो. त्यामुळेच क्रीडानगरी अशीही पुण्याची ओळख आहे. पण कोविडचे कारण देत पुण्याच्या महापालिकेकडून खेळांडूच्या योजनांना ब्रेक लावण्यात आल्याचे चित्र आहे. खेळाडू दत्तक योजना तसेच शिष्यवृत्ती योजनेची मागील दोन वर्ष अंमलबजावणीच झालेली नाही.
महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये दत्तक योजनेचे धोरण तयार करण्यात आले होते, तर त्याला मान्यता देणारा ठराव २०२० मध्ये मंजूर झाला आहे. त्यानुसार हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, खोखो, मैदानी खेळ, मल्लखांब, बॉक्सिंग हे आठ खेळ निश्चित करण्यात आले असून त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. पालिकेने २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांसाठी प्रत्येकी वीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली, पण प्रत्यक्षात त्यातील एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही. मुळात या योजनेचे निकषच अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
शिष्यवृत्ती योजनेतून २०१९-२० या वर्षी सुमारे ३२५ खेळाडूंना ७१ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली होती, पण त्यानंतरची दोन वर्षे खेळाडूंना शिष्यवृत्तीच देण्यात आली नाही. या योजनेत क्रीडा प्रकारानुसार अर्थसाहाय्य निश्चित करण्यात आले आहे. शालेय आणि विद्यापीठ स्तरावरील खेळाडू शहर, राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले असल्यास अनुक्रमे १०, २० आणि ३० हजार रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे, तर खुल्या गटासाठी ही रक्कम अनुक्रमे २०, ३० आणि ५० हजार एवढी आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येणार असल्याचे समजते.
दत्तक योजनेच्या माहितीबाबत महापालिकेतील क्रीडा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे सांगितले. तसेच सध्या तरी अंमलबजावणी करण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘‘कोविडमुळे या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. तसेच सध्याही स्थिती जैसे थे आहे,’’ असे ते म्हणाले. सेठ दगडूराम कटारिया शाळेतील क्रीडाशिक्षक हर्षल निकम यांनीही अशा योजनांची नितांत गरज असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. ‘‘शालेय स्तरापासूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते. अनेक खेळाडू शालेय, जिल्हा स्तरापर्यंत चांगली कामगिरी करत असतात, पण त्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण तसेच
सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे हे खेळाडू पुढे जात नाहीत. असे काही खेळाडू आम्ही पाहिले आहेत. त्यांना आर्थिक मदत तसेच सुविधा उपलब्ध करून दिल्यास राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चांगली कामगिरी करू शकतात,’’ असे निकम यांनी नमूद केले.
खेळाडू दत्तक योजनेत हे मिळेल
दरवर्षी योजनेसाठी २० लाख रुपयांचा निधी
खेळाचे कीट, आहार, गणवेश
स्थानिक प्रशिक्षण मिळणार
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मानधन देणार
स्थानिक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्यास प्रवास आणि इतर भत्ते
एकाही खेळाडूला आतापर्यंत दत्तक योजनेचा लाभ दिलेला नाही. कोविडमुळे या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. या योजनेसाठीचे काही निकष निश्चित करणे आवश्यक आहे. किती खेळाडूंना दत्तक घ्यायचे, त्यांचे वय, त्यांची आर्थिक स्थिती आदी मुद्यांवर निर्णय झालेला नाही. पुढील महिन्यात याबाबत समितीची बैठक घेऊन निकषांबाबत धोरण ठरविले जाईल.
- संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा विभाग, पुणे महापालिका
कोणत्याही योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य अथवा शिष्यवृत्ती मिळणे ही खेळाडूंसाठी अतिशय मोठी गोष्ट असते. मी ज्युनिअर स्तरावर खेळत होतो, तेव्हा चांगली कामगिरी करूनही मला कधीच असा लाभ मिळाला नाही. त्याचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. नंतर त्यातून मी सावरलो. हल्ली खेळाचे साहित्य, क्रीडाविषयक आहार महागला आहे. अशा परिस्थितीत अर्थसाहाय्य अथवा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना, माझा खर्च मी करू शकतो. आई-वडिलांचा तेवढा तरी खर्च आपण कमी करू शकतो, ही भावना खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे महापालिकेने खेळाडू दत्तक योजना तसेच शिष्यवृत्ती तातडीने सुरू करायला हवी. त्याचबरोबर रकमेत वाढदेखील करावी.
- नितीन कीर्तने, केंद्र सरकारचा ध्यानचंद पुरस्कारविजेते आंतरराष्ट्रीय टेनिसपटू
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.