मांजरा बोले, शेजारणी लागे
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
पाळीव प्राणी माणसांप्रमाणेच भांडतात, असे समजले जाते. तर कधी कधी माणसं प्राण्यांसारखे भांडतात. मात्र आता पाळीव प्राण्यांवरून माणसांत भांडणे लागत आहेत. आधी बकरीवरून, पोपटावरून माणसा-माणसांत झालेल्या भांडण्यांनंतर आता पाळीव मांजरीवरून झाल्या भांडणाचा गमतीशीर प्रकार अमोर आला आहे. पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमधील वाद चर्चेत आला असून या वादामागे एक पाळीव मांजर कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
मांजरीवरून शेजारी राहणाऱ्या दोन बायकांमध्ये जुंपली. हा वाद एवढा विकोपाला गेला की हे प्रकरण खडकी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. दोन्ही शेजाऱ्यांनी एकमेकांवर मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे आरोप केले आहेत. तक्रारींवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी उषा मधुकर वाघमारे (वय ४५, रा. सावंतनगर बोपोडी, खडकी, पुणे) आणि रेश्मा सलिम शेख (वय ४५, रा. शेजारी) यांनी परस्परविरोधी तक्रारी केल्या आहेत. त्याच झालं असं की, उषा आणिa रेश्मा या महिला पुण्यातल्या खडकी परिसरात शेजारी राहतात. रेश्मा यांच्याकडे एक भटकी मांजर आहे. जिला त्या सांभाळतात. शनिवारी दुपारच्या वेळेत उषा वाघमारे या घरात कपडे धुवत असताना मांजर त्यांच्या घरात गेली.
हे पाहून रेश्माने उषाच्या घरात जाऊन तिला परत आणलं. मात्र, परत आणत असताना रेश्माने मांजराला दरडावलं. कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही का? असं रेश्माने मांजराला विचारले.
रेश्माने या मांजरीवरून घालून पाडून बोलल्याने उषाही संतापल्या. यामुळे दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. या वादात नंतर एकमेकींना त्या शिव्या देऊ लागल्या. हा वाद टोकाला जात उषा आणि रेश्मा यांच्यात हाणामारी झाली. आणि हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी दोघींची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणी दोघींनी एकमेकांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
याआधी ऑक्टोबर २०२२ मध्ये बकरी दारात बांधली आणि तिच्या आवाजाचा त्रास होत आहे. या कारणावरून बकरी मालकाने मारहाण केली होती. हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात गेला होता. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला आणि हा वाद टोकाला गेला. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलगा खडकी परिसरात एकमेकांच्या शेजारी राहतात. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.