मुंबईत अलिशान फ्लॅटचे आमिष, पुणेकरांना अडीच कोटींचा गंडा
सीविक मिरर ब्यूरो
मुंबई येथील ओशियन हाईटस या बांधकाम प्रकल्पात अलिशान घर कमी पैशात देतो, असे म्हणून विश्वास संपादन करुन पुण्यातील एका कुटुंबाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मंगल नागनाथ परकाळे (वय ४५, रा. काेथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे अमरजित जितेंद्र शुक्ला (वय ३८, रा. जाेगेश्वरी, मुंबई) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार १३ सप्टेंबर २०२२ ते २ मार्च २०२३ या काळात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी अमरजित शुक्ला याने तक्रारदार मंगल परकाळे यांना मुंबईतील ओशियन हाईटस नावाच्या आलिशान प्रोजेक्टमधील फ्लॅट कमी पैशात मिळवून देतो, असे आमिष दाखवले होते. त्याने परकाळे यांचा विश्वास संपादित करत त्यांना फ्लॅटमध्ये दाेन काेटी ५५ लाख रुपये गुंतविण्यास सांगितले. त्यांनी तसे केल्यानंतर आराेपीच्या ओशियन हाईटस येथील फ्लॅटवर दुसऱ्या बँकेचे कर्ज असल्याचे परकाळे यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी आराेपीस पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, आराेपीने पैसे परत न करता त्याची ४० लाख रुपये किंमतीची रेंन्ज राेवर गाडी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन देण्याची तयारी दर्शवली. मात्र ती प्रक्रियाही पूर्ण झाली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पती नागनाथ परकाळे यांनी आराेपीस गाडी ताब्यात देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांना आराेपीने ‘गाडी मी तुला देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे सांगून परकाळे यांचे नावे मालकी हक्क रजिस्ट्रेशन झालेली गाडी त्यांना देण्यास नकार दिला. या फसवणुकीबाबत शुक्लावर गुन्हा दाखल करून काेथरुड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. माळी अधिक तपास करीत आहेत.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.