‘एनडीए’त नोकरीचे आमिष, २८ लाख लुटले

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) नोकरी लावणे तसेच विद्युत कामाचा ठेका मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 05:29 pm
‘एनडीए’त नोकरीचे आमिष, २८ लाख लुटले

‘एनडीए’त नोकरीचे आमिष, २८ लाख लुटले

चौघांची फसवणूक, विविध पदांवर नेमणुकीचे तसेच विद्युत कामांच्या ठेक्यांचे िदले होते आश्वासन

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) नोकरी लावणे तसेच विद्युत कामाचा ठेका मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद गोविंद वझे (रा. लक्ष्मी पार्क सोसायटी, कोंढवे धावडे), परमेश्वर अंकुश शिंदे (रा. ब्रम्हा हॉटेलसमोर, सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विजय साखरे (वय ४२, रा. भूमकर चौक, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरे इलेक्ट्रिक अभियंता आहेत. त्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या पुरविण्याचा व्यवसाय आहे. तर आरोपी शिंदे याचादेखील प्रवासी वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यातून साखरे यांची आरोपी शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदेने साखरे यांच्याकडे वझे याची एनडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली.

वझे एनडीएमध्ये कायमस्वरूपी लिपिक पदावर नोकरी लावून देतील. तसेच त्याच्या ओळखीतून विद्युत विषयक कामाचा ठेकादेखील मिळेल, असे आमिष शिंदेने फिर्यादींना दाखविले. साखरे यांच्या पत्नीला एनडीएमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्यासाठी आरोपींनी ८ लाख रुपयांची मागणी केली. साखरे आणि त्यांच्या तीन नातेवाइकांनी वझे आणि शिंदेला ऑनलाइन तसेच रोखीने एकूण २८ लाख रुपये देवून एनडीएमध्ये नोकरी मिळवून देण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी नोकरी लावून दिली नाही. तसेच विद्युत विषयक कामाचा ठेकाही मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story