Loan : मैित्रणीच्या नावे कर्ज; ६९ लाखांची फसवणूक

भावनिक साद घालून जीवलग मैत्रिणीच्या नावावर ८० लाख रुपयांचे कर्ज काढल्यानंतर काही काळाने ते फेडण्यास नकार देण्याचा प्रकार बिबवेवाडीत घडला. या प्रकरणी ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 6 May 2023
  • 04:10 am
मैित्रणीच्या नावे कर्ज; ६९ लाखांची फसवणूक

मैित्रणीच्या नावे कर्ज; ६९ लाखांची फसवणूक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

भावनिक साद घालून जीवलग मैत्रिणीच्या नावावर ८० लाख रुपयांचे कर्ज काढल्यानंतर काही काळाने ते फेडण्यास नकार देण्याचा प्रकार बिबवेवाडीत घडला. या प्रकरणी ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.

काढलेले कर्ज फेडण्यास नकार देऊन मैत्रिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिला फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. घेतलेले पैसे मागण्यासाठी मैत्रिणीकडे गेली असता तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय महिलेची फसवणूक करणाऱ्या मैत्रिणीसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  या प्रकरणी कल्याणी शशिकांत लोणकर (वय ३४), शशिकांत वसंत लोणकर (वय ५६), समीधा शशिकांत लोणकर, ऋतीका लोणकर, सुशील लोणकर, उत्तम शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कल्याणी लोणकर आणि फिर्यादी या एकाच सोसायटीमध्ये राहतात. त्या दोघी जीवलग मैत्रिणी आहेत. आरोपी कल्याणीने ‘‘माझे वैवाहिक आयुष्य संपुष्टात येत आहे. मला पैशांची नितांत आवश्यकता आहे. पैसे मिळाले नाहीत तर माझे लग्न मोडेल...’’ अशा स्वरूपात स्वतःच्या वैवाहिक जीवनातील अडचणी सांगून भावनिक साद घालत तातडीने ५० ते ६० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी तक्रारदार मैत्रिणीकडे मदत मागितली. ‘‘मला मदत कर. तुझ्या नावावर बँकेतून कर्ज काढ. मी नियमित दरमहा कर्जाचा हप्ता भरेन,’’ अशी विनवणी करून तिला विश्वासात घेतले आणि कर्ज काढण्यास भाग पाडले.

बँकेकडून एवढी मोठी रक्कम असलेले कर्ज मला मिळणार नसल्याचे तक्रारदार महिलेने कल्याणीला सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी कल्याणीने तक्रारदार महिलेची उत्तम शेळके नावाच्या एका व्यक्तीसोबत ओळख करून दिली. ‘‘उत्तम शेळके हा बँकेतील कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे काम करतो. तो नॅशनल बँकेचा सेलिंग एजंट आहे,’’ असे सांगून कर्जमंजुरीसाठी शेळके यांच्याकडे मैत्रिणाला कागदपत्रे देण्यास भाग पाडले. या कागदपत्रांचा गैरवापर करून आरोपी कल्याणीने मैत्रिणीच्या नावावर ८० लाख रुपयांचे कर्ज काढले. कल्याणीने कर्ज काढल्यानंतर सुरुवातीचे काही काळ त्याचे हप्तेही भरले. सुरुवातीच्या काळातील एकूण ४८ लाख चार हजार रुपयांचे कर्ज चुकते केले. मात्र पुढील शिल्लक राहिलेले हप्ते भरण्यास इन्कार केला.

उरलेले हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार महिलेला दर महिन्याला १ लाख ७० हजार रुपये हप्ता भरावा लागत होता. त्यामुळे तक्रारदार महिलेस आर्थिक झळ सोसावी लागत होती. त्यामुळे तक्रारदार महिलेने कल्याणीला पैसे भरण्यास सांगितले. त्यावर ‘‘माझे काका शहरातील एका पोलीस ठाण्यात आहेत. काकाला सांगेन,’’ अशी उलट धमकी कल्याणीने दिली. पीडित महिलेने काही कर्जाचे हप्ते कसेबसे फेडले होते. मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने ती कल्याणीच्या आई-वडिलांकडे आणि बहिणीकडेही दाद मागण्यास गेली. तिच्या आई-वडिलांनी तक्रारदार महिलेस मारहाण केली आणि बहिणीने संपवून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी कल्याणीसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story