Punekars : पुणेकरांचे ऐका!

'कोणत्याही शहराची नेमकी गरज काय आहे आणि त्या शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि खऱ्या अर्थाने 'स्मार्ट' करण्यासाठी काय करायले हवे याबाबत सरकारने त्या शहरातील नागरिकांचे म्हणणे ऐकायला हवे. त्यामुळे पुणे शहर 'स्मार्ट' करण्यासाठी पुणेकरांचे ऐका', असे आवाहन विद्यमान आमदार आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 7 May 2023
  • 03:08 pm
पुणेकरांचे ऐका!

पुणेकरांचे ऐका!

शहरात टेकडीफोड आणि नदीसुधारची ऊरफोड करणाऱ्या सरकारला 'युवा' ठाकरेंचे आवाहन...

मयूर भावे

mayur.bhave@civicmirror.in

TWEET@mayur_mirror

'कोणत्याही शहराची नेमकी गरज काय आहे आणि त्या शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि खऱ्या अर्थाने 'स्मार्ट' करण्यासाठी काय करायले हवे याबाबत सरकारने त्या शहरातील नागरिकांचे म्हणणे ऐकायला हवे. त्यामुळे पुणे शहर 'स्मार्ट' करण्यासाठी पुणेकरांचे ऐका', असे आवाहन विद्यमान आमदार आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केले. पुणे टाइम्स मिरर व सीविक मिररच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या 'टॉप नॉच क्लब' च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पुणे स्मार्ट बनवायचे, पण नक्की कसे?' या परिसंवादात ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपण वेताळ टेकडीच्या संरक्षणास पाठिंबा देत असून, नदीसुधारला विरोध करत असल्याचे जाहीर केले.

या वेळी जगप्रसिद्ध उद्योजिका, थरमॅक्सच्या माजी अध्यक्षा श्रीमती अनु आगा, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, जिल्हा रोटरी गव्हर्नर अनिल परमार, पीसीएमसीच्या 'स्मार्ट सिटी मिशन'चे प्रमुख सल्लागार नीतिन जैन, सीविक मिरर व पुणे टाइम्स मिररचे अध्यक्ष पंकज शर्मा, लेक्सिकॉन ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष नीरज शर्मा, लेक्सिकॉन ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक मनीषा शर्मा आणि संचालक दीप्ती शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक आणि सजग नागरिक उपस्थित होते. परिसंवादाचे निवेदन पुणे टाइम्स मिरर व सीविक मिररच्या निवासी संपादक विनिता देशमुख यांनी केले. 

आदित्य ठाकरे यांनी पुण्याशी निगडित विविध समस्यांवर या वेळी अत्यंत चपखलपणे भाष्य केले. ते म्हणाले, 'वेताळ टेकडीचे संरक्षण करण्यासाठी आणि तथाकथित नदीसुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकत्र येणे ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. यासाठी मी सर्व पुणेकरांचे अभिनंदन करतो आणि पुणे टाइम्स मिररने हा विषय लावून धरला त्याबाबत त्यांचेही कौतुक करतो. पुणेकर सजग आहेत. त्यामुळे त्यांच्या शहराबाबत त्यांना इतर कोणाहीपेक्षा अधिक चांगले समजते. आज पर्यावरणाला वाचवण्यावर भाष्य केले की, तुम्हाला पर्यावरणवादी, कार्यकर्ते, चळवळीतील कार्यकर्ते असे करत थेट अर्बन नक्सल इथपर्यंत अनेक टॅग लावले जातात. मात्र, शहराच्या भल्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन विचार होणे अपेक्षित आहे.'

नागरिक आणि प्रशासनाने शॉर्ट टर्म स्वरूपाची ध्येये न ठेवता २०-२५ किंवा ५० वर्षांनी काय परिस्थिती असेल, याचा विचार करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'शाश्वत विकासाची व्याख्या ठरवायला हवी. शहरीकरणाचा बाऊ करता कामा नये. योग्य त्या प्रमाणात होणाऱ्या शहरीकरणाचे स्वागत आहेच. वाहतूक, दळणवळण या गोष्टींचा सारासार विचार होऊनच मेट्रोसारखे प्रकल्प आखले जावेत. 

त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची नासाडी होऊन हाती काही लागत नसेल, तर बसचे जाळे अधिक विस्तृत करायला हवे. ई-बसची संख्या पुण्यात वाढायला हवी. शहर किती सुधारलेले आहे त्याहीपेक्षा ते किती सुरक्षित आहे याचा विचार करावा.'

'पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पातून नेमके काय साध्य होणार,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, 'नदीसुधारच्या नावाखाली तथाकथित सुशोभीकरण नागरिकांवर लादले जाते. त्याने पर्यावरणास हानी होते आणि निधीही वाया जातो. मी मिठी नदीच्या अगदी जवळ राहतो. त्यामुळे त्या नदीचे हाल काय होत आहेत, हे आम्ही जवळून पाहिले आहे. नदीत भराव घालून घालून तिचा छोटा नाला करायचा आणि नंतर तोच नाला रुंद करून त्याचे सुशोभीकरण करून त्याला नदीसुधार असे नाव द्यायचे, असा काहीसा हा प्रकार आहे. वेताळ टेकडीची पाहणी मी स्वतः केली. तिथेच मेट्रो, तिथेच बोगदा, तिथेच डबल डेकर असे प्रकल्प राबवायचे असतील, तर ती टेकडीच सपाट करून टाका', अशा शब्दांत त्यांनी आपला उद्वेग व्यक्त केला. 

'विधायक कार्याला नागरिकांचा पाठिंबा'

सीविक मिरर व पुणे टाइम्स मिररचे अध्यक्ष पंकज शर्मा म्हणाले की, 'कोणतीही संघटना जर चांगल्या हेतूने एखादे विधायक कार्य हाती घेऊन काम करत असेल, तर तिच्यामागे अनेक लोक उभे राहतात. त्या संघटनेला नागरिकांचा पाठिंबा मिळतो. पुणे टाइम्स मिरर आणि सीविक मिररला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होतो. आपल्या शहराबाबत काही त्रुटी राहात असतील, तर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घ्यायला हवी.'

'तुम्ही जे मागाल, ते मिळेल'

लेक्सिकॉन ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट आणि सीविक मिरर व पुणे टाइम्स मिररचे उपाध्यक्ष नीरज शर्मा यांनी सांगितले की, 'कायदा-सुव्यवस्था, माध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक या चार स्तंभांवर कोणत्याही शहराचे भवितव्य ठरते. त्यामुळे या चारही स्तंभांकडून ज्या पद्धतीने गोष्टींची अंमलबजावणी केली जाते, त्याचप्रमाणे भविष्यात पडसाद उमटलेले दिसतात. तुम्ही मागाल, तेच तुम्हाला मिळेल, हे तत्त्व नागरिकांनी लक्षात ठेवायला हवे आणि त्यानुसारच काम करावे.'  

'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक' 

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्मार्ट शहराचे नियोजन केल्यास अनेक गोष्टी सोप्या होतात, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख सल्लागार नितीन जैन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, 'पाण्याचे व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतुकीचे नियोजन करणे अशा अनेक गोष्टी आता तंत्रज्ञानामुळे प्रभावी पद्धतीने करणे शक्य झाले असून, आम्ही त्यावर भर देत आहोत.'

'पुण्यात वैद्यकीय सुविधांची वानवा'

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, 'पुण्यात ससून हे केवळ एकच सरकारी रुग्णालय आहे, तसेच संसर्गजन्य आजारांसाठीदेखील नायडू रुग्णालय हे एकच आहे. या तुलनेत ६६० खासगी रुग्णालये असून, २५ मोठी कॉर्पोरेट रुग्णालये आहेत. संसर्गजन्य आजारांसाठी १५०० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असून, ते लवकरात लवकर उभारण्याची गरज आहे. पुण्यात हॉटलची वाढती संख्या आणि खाऊ गल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, यामध्ये खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि अस्वच्छता या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते. यामुळे रोगांचे प्रमाण वाढले आहे. पुणेकरांना स्मार्ट कार्ड द्यायला हवेत. त्यावर लसीकरणासह अनेक बाबींची नोंद ठेवली जाईल.'

''सीएसआर'ची व्याख्या बदलावी'

''सीएसआर'ची व्याख्या आता 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' अशी न करता 'सिटीझन्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' अशी करणे आवश्यक आहे,' असे मत रोटरीचे जिल्हा गव्हर्नर अनिल परमार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, 'पुण्यात रोटरी सर्व कार्यक्षेत्रांत काम करते आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनादेखील रोटरीने साहाय्य केले आहे. ससूनसारख्या रुग्णालयांना वेळोवेळी विविध वैद्यकीय सुविधा पुरवणे, कापडी पिशव्यांची मोहीम, तंबाखूला विरोध करण्यासाठी जनजागृती असे अनेक उपक्रम रोटरीच्या वतीने राबवण्यात आले आहेत. '

सुरक्षा, पर्यावरण, 

शिक्षणाची त्रिसूत्री

उद्योजिका अनु आगा यांनी सांगितले की, 'सुरक्षा, पर्यावरण आणि शिक्षण या तीन मुद्द्यांवर प्रामुख्याने पुण्याचा विचार व्हायला हवा. अपघातांच्या प्रमाणात पुणे शहर आघाडीवर आहे. त्यामुळे पालक मुलांना सायकल चालवण्यासाठी सोडू शकत नाही. विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात शैक्षणिक संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तर गुणवत्ता खालावते आहे. पर्यावरणाच्या बाबतीतही पुण्याची स्थिती गंभीर आहे. एके काळी संपूर्ण शहर हिरवेगार होते. आज शहराचे वातावरण बदलले असून, ढगफुटीसारख्या घटना वारंवार घडत आहे. वेताळ टेकडीसारख्या टेकड्या ही शहराची फुफ्फुसे आहेत. त्यांचे संरक्षण करायलाच हवे.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story