कोंडीचीच करू कोंडी, बनू रस्त्याचे राजे

सध्या शहरात जिथे बघावे तिथे विकासकामांचा धुरळा उडालेला दिसून येतो. यामध्ये उंचच उंच निवासी संकुल, आधुनिक संकल्पना वापरून उभारलेली विविध कार्यालये, मेट्रोचे ट्रॅक तसेच नागरिकांना प्रवास अधिक सोईचा व्हावा यासाठी रस्त्यांची बांधकामे आदींचा समावेश करावा लागेल. या वाढीचे आणि विकासकामांचे कौतुक करायलाच हवे. मात्र, त्यासोबतच दिवसेंदिवस बेसुमार वाढणाऱ्या वाहनांमुळे पुण्यावर येणाऱ्या ताणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:08 am

कोंडीचीच करू कोंडी, बनू रस्त्याचे राजे

सध्या शहरात जिथे बघावे तिथे विकासकामांचा धुरळा उडालेला दिसून येतो. यामध्ये उंचच उंच निवासी संकुल, आधुनिक संकल्पना वापरून उभारलेली विविध कार्यालये, मेट्रोचे ट्रॅक तसेच नागरिकांना प्रवास अधिक सोईचा व्हावा यासाठी रस्त्यांची बांधकामे आदींचा समावेश करावा लागेल. या वाढीचे आणि विकासकामांचे कौतुक करायलाच हवे. मात्र, त्यासोबतच दिवसेंदिवस बेसुमार वाढणाऱ्या वाहनांमुळे पुण्यावर येणाऱ्या ताणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात जा... कोणत्या ना कोणत्या अडथळ्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दृष्टीस पडते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरांतर्गत प्रवासासाठी पुणेकरांचा अधिक वेळ वाया जात आहे. काही भागातील नागरिकांसाठी तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे दिव्यच ठरत आहे. यामुळे अनेकजण नाईलाजाने बाहेर पडणे टाळतात.

पुणेकरांचा विचार करता ही समस्या अतिशय बिकट आहे. मात्र, या संदर्भात नुसता तक्रारींचा पाढा वाचण्याऐवजी यावर उपाय शोधण्यासाठी ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाईम्स मिरर’ने पुढाकार घेत पुणे शहर पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने काही पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांवर आरोप करणे, वाहतूक पोलिसांसोबत वाद घालणे, वाहतुकीचे नियम मोडणे अशा कृतींमुळे या सुंदर शहराला सतावणाऱ्या वाहतूककोंडीच्या भयावह त्रासापासून मुक्ती मिळणे शक्य नाही. आपण सर्वांनी काही काळ शांतचित्ताने खाली बसून स्वत:ला हा प्रश्न नक्की विचारावा... 

आपण ही समस्या कशी सोडवू शकतो? दिवसेंदिवस अक्राळविक्राळ होत असलेल्या शहरातील वाहतूककोंडीरुपी राक्षसाला नियंत्रित करण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो?

पुणेकरांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी योगदान द्यावे, तसेच आणखी परिणामकारक उपाय सुचवावे, यासाठी ‘जरा देख के चलो’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वय, लिंग विसरून आपण पुणेकर वाहतूक पोलिसांसोबत उभे ठाकलो तर रस्त्यांवरील ही कोंडी फोडण्याबाबत आपण चांगले उदाहरण इतरांसमोर ठेवू शकू. याबरोबरच आपणा सर्वांचे आयुष्य सुसह्य होईल.

शहरातील अनेक ठिकाणे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहेत. दारू पिऊन वाहन चालविणे, अतिवेग, नियम मोडणे, फुटपाथवरून वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने (राॅंग साईड) वाहन चालविणे यामुळे रस्त्यांवर अनेकदा जीवघेणा अनर्थ घडतो. हे टाळण्यासाठी माझे पुणेकरांना कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे आणि ‘रस्त्यावरचे राजे’ बनून या उपक्रमात सहभागी व्हावे. आपण टीम  म्हणून एकत्र आल्यास या समस्येवर तोडगा नक्कीच काढता येईल, असा विश्वास मला वाटतो. त्याचबरोबर अधिकाधिक नागरिकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण होऊन सध्या भेडसावणाऱ्या समस्येत नक्कीच सुधारणा होईल.

वाहतुकीच्या संबंधित समस्यांचा विचार करता पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कोंदट शहर आहे. त्याचबरोबर पुणे हे जगातील सहावे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे. ही परिस्थिती बदलण्याचा आपण निर्धार करू या. सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनी २८ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमला भरभरून प्रतिसाद दिला, याचा मला विशेष आनंद वाटतो. या एका महिन्याच्या काळात ‘रस्त्यावरचे राजे’ हे पुणेकर स्वयंसेवक शहरातील वर्दळीच्या ३० ठिकाणी कर्तव्य बजावतील. आपण सुनियोजितपणे एकत्र आल्यास त्याचा शहरावर दीर्घकालीन आणि लक्षणीय प्रभाव पडेल, याबाबत माझ्या मनात अजिबातही शंका नाही.

पुणे शहर पोलिसांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या उपक्रमात आपल्याला अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक आणि वाहतूक उपायुक्त विजय मगर यांच्याकडून लाभलेल्या भरीव सहकार्याचा यात विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.

मी सर्व वाचकांना आवाहन करतो की, या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी पुढे यावे. तुम्हा प्रत्येकाच्या समावेशामुळे टीमची ताकद वाढेल. समाजसेवा तसेच चांगल्या नागरिकत्वाचे उदाहरण जगासमोर ठेवण्यासाठी आपण एकत्र येऊ या. छोटे छोटे उपाय अंगीकारल्यास किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो, याची माहिती आपले कुटुंबीय आणि मित्रांना आवर्जून द्या, अशी विनंती तुम्हा सर्वांना आहे. पुढे या आणि ‘रस्त्यावरचे राजे’ या उपक्रमात सामील व्हा.

‘देश तुमच्यासाठी काय करू शकतो, याऐवजी तुम्ही देशासाठी काय करू शकता, हे विचारा’ या सुविचाराची अंमलबजावणी करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. लक्षात ठेवा, केवळ तक्रार करणे पुरेसे नाही. एकत्रितपणे पुढे या आणि ही समस्या सोडविण्यासाठी योगदान द्या.

बदल शक्य आहे, या शब्दांवर विश्वास ठेवून कार्यतत्पर होण्यासाठी एकत्र येत असल्याबद्दल पुणेकरांनो तुमचे धन्यवाद.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story