बिबट समितीत तज्ज्ञ फक्त आमदारच

पुणे शहराच्या चारही बाजूला बिबट्याचे वास्तव्य असून ते अधून-मधून मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. एवढेच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे सतत येत असून त्यांच्या हल्ल्यांना मनुष्याबरोबर पाळीव प्राण्यांनाही सामोरे जावे लागते. पुण्याबरोबर राज्यातही हा प्रश्न असल्याने सरकारने मानव आणि बिबट संघर्षावर समिती नेमली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 10:46 am
बिबट समितीत तज्ज्ञ फक्त आमदारच

बिबट समितीत तज्ज्ञ फक्त आमदारच

सरकारी १६ जणांच्या समितीत वन्यजीव अभ्यासक बेदखल, वनाधिकाऱ्यांकडे फक्त बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पुणे शहराच्या चारही बाजूला बिबट्याचे वास्तव्य असून ते अधून-मधून मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. एवढेच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे सतत येत असून त्यांच्या हल्ल्यांना मनुष्याबरोबर पाळीव प्राण्यांनाही सामोरे जावे लागते. पुण्याबरोबर राज्यातही हा प्रश्न असल्याने सरकारने मानव आणि बिबट संघर्षावर समिती नेमली आहे. मात्र, विशेष म्हणजे या समितीवर तज्ज्ञ म्हणून केवळ आमदारांचीच नेमणूक केली आहे. त्यात एकही वन्यजीव अभ्यासक नाही. समन्वयक असलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बैठक बोलावणे आणि आवश्यक माहिती पुरवण्याचे काम करणार आहेत.      

वारजे परिसरात सोमवारी बिबट्याने इमारतीत तळ ठोकल्याचे आढळून आले होते. आंबेगाव तालुक्यात बिबट्याने पुन्हा एकदा गरोदर महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कात्रज परिसरातही अनेक वेळा बिबटे आढळून आले असून त्यांच्या हल्ल्यात अनेकदा शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. राज्याच्या विविध भागातही हा प्रश्न सतत भेडसावताना दिसत आहे. त्यामुळे हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरकारने बिबट्या आणि मानव संघर्षावर समिती नेमली आहे. मात्र, समितीवर तज्ज्ञ म्हणून केवळ आमदारांचीच नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

राजकारणाचे क्षेत्र गाजवणारे आमदार आता या समितीतून बिबट-मानव संघर्षावर कशा पद्धतीने उपाययोजना सुचवणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. समितीचे समन्वयक असलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बैठक बोलावणे आणि आवश्यक माहिती पुरवण्याचे काम करणार आहेत. आता या समितीत वन्यजीव अभ्यासकांना स्थानच नसल्याने समितीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

राज्यात लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरण्याच्या घटनांत गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. पुण्याच्या वेशीवर बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत आहे. कात्रज परिसरात बिबट्याचा वावर आहे. कोंढवा आणि हडपसर भागातही यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. सोमवारी (दि.२०) सकाळी वारज्यात बिबट्याने धुमाकूळ घातला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात बिबट्याचा संर्घष नाजूक बनला आहे. बारामती, भोर, वेल्हे या भागातही बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधान मंडळामध्ये केली होती. त्यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मानव-बिबट संघर्षावर उपाययोजना सुचवण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर वन विभागाने १५ सदस्य असलेल्या आमदारांच्या तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे.

हे असणार समिती सदस्य...

वाढलेली लोकसंख्या, नागरी वस्तीमधील बिबट्याचा वाढलेला वावर,  नागरिकांना होणारा त्रास याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी वन मंत्रालयाने सोमवारी (दि.२०) समितीची स्थापना केली. समितीत १५ आमदारांचा समावेश आहे. समीर कुणावार, संजय कुटे, आशिष जैस्वाल, अशोक उईके, कृष्णा, गजबे, प्रतिभा धानोरकर, मदन येरावार, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अतुल बेनके, मानसिंग नाईक, सुनील प्रभू, अशोक पवार यांचा समितीत समावेश आहे. समितीचे समन्वयक म्हणून पश्चिम मुंबईतील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांवर समितीची बैठक आयोजित करणे, त्यांना आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच, समितीचे अभिप्राय व शिफारसी संकलित करून अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्या माध्यमातून सरकारला सादर करावा, असा निर्णय वन विभागाने घेतला आहे. या समितीत आमदारच तज्ज्ञ म्हणून असणार आहेत. वन्य जीव अभ्यासकांना यात स्थान दिलेले नाही. इतकेच काय तर वन विभागातील अधिकारी अथवा प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे अधिकारीही यात नाहीत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story