बिबट्याची पिले मरताहेत उपासमारीने

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दीड महिन्यात आठ बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील दोन, दीड महिन्यांचे दोन, १५ दिवसांचे दोन व ४० दिवसांच्या दोन बछड्यांचा समावेश आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार आईची ऊब, दूध न मिळाल्याने उपासमारी व थंडीमुळे मृत्यू झाल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 11:02 am
बिबट्याची पिले मरताहेत उपासमारीने

बिबट्याची पिले मरताहेत उपासमारीने

ऊसतोडणी दरम्यान होते ताटातूट; एकट्या आंबेगावात दीड महिन्यात आठ बछड्यांचा मृत्यू

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दीड महिन्यात आठ बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील दोन, दीड महिन्यांचे दोन, १५ दिवसांचे दोन व ४० दिवसांच्या दोन बछड्यांचा समावेश आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार आईची ऊब, दूध न मिळाल्याने उपासमारी व थंडीमुळे मृत्यू झाल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

विधानसभेत प्रश्नोत्तर तासात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बिबट्यांची वाढत चाललेली संख्या व मानवावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत वनखात्याने तातडीने उपाययोजना हाती घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. ते म्हणाले, ‘‘बिबट्यांची संख्या हा शहरी व ग्रामीण भागात वाढता प्रश्न असून, बिबटे माणसांवरही हल्ले करू लागले आहेत. मतदारसंघात १५ दिवसांपूर्वी चार बिबटे मृतावस्थेत आढळले. त्यांचे शवविच्छेदन केल्यावर उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल आला आहे. बिबट्यांची प्रजनन क्षमता कमी करण्याचे नियोजन वनअधिकाऱ्यांकडे आहे. 

ते समजून घेऊन प्रजनन कमी करता आले; तर त्याचा फायदा होईल.’’

मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस  म्हणाल्या, ‘‘बिबट्या दोन वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईसोबत असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला दूध व सकस आहार मिळतो, पण ऊसतोडणी सुरू असल्याने बिबटे सैरावैरा झाले आहेत. अनेकदा मादी जागा बदलत असते. अशावेळी आई व बछड्यांची ताटातूट होते. त्यांना दूध मिळत नाही. उपासमारीमुळेच बछड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. सापडलेले बछडे वन कर्मचाऱ्यांमार्फत सुखरूपपणे मादीच्या सहवासात जातील, अशा पद्धतीचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत सहा बछड्यांना मादीकडे सुपूर्द करण्यात वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.’’

या संदर्भात वन विभागाने आवाहन केले असून, ऊस तोडणीच्या वेळी बिबट्याची पिल्ले दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे. बिबट्याच्या पिल्लांना हाताळू नये. त्यांचे फोटो किंवा सेल्फी काढू नये. बिबट विहिरीत अडकल्यास त्वरित वनविभागाला कळवावे. गोंधळ गर्दी करू नये. वनविभागाला त्याची सुटका करण्यास मदत करावी. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला डिवचू नये. किंवा त्याचे फोटो काढू नये. बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नये. अफवांकडे दुर्लक्ष करावे. शेतीकाम करत असलेल्यांनी बिबट हल्ला करू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी. ऊस मजुरांनी ऊस तोडणी करताना सूर्योदयाच्या आधी व सूर्यास्तानंतर ऊस तोडणी करू नये. अशा प्रकारची खबरदारी शेतकरी, नागरिक यांनी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story