नेते शिंदेंसोबत, शिवसैनिक मात्र ठाकरेंसोबत : पवार
विजय चव्हाण
मी महाराष्ट्रात फिरत आहे. नेते जरी शिंदे यांच्याकडे गेले असले तरी सामान्य कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. तांत्रिक मुद्दयांचा बागूलबुवा करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणार्यांना लोक धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. २२) केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा आणि बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘‘सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फोडण्यात आली. पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. तांत्रिक मुद्दयांचा बागूलबुवा करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोक त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत. सध्या हा निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे यावर मी अधिक भाष्य करणार नाही.’’
‘‘देशात यापूर्वी काँग्रेस, समाजवादी पक्षात फूट पडली. पण अख्खा पक्ष चिन्हासकट एखाद्या गटाच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न यापूर्वी कधीच झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाला काही मार्गदर्शन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देश आणि राज्यात अराजकाची स्थिती भाजपने निर्माण केली आहे. देशात जातीय तणाव वाढवायचा, हुकूमशाही रितीने राज्यकारभार करायचा, आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करायची, ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटीशांच्या नितीनुसार राज्य करायचे, या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे. मतपेटीतून ते याचे उत्तर देतील,’’ असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
देशातील अराजकाच्या भूमिकेवर परखड भाष्य केले. देशातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. जनता बेकारी आणि महागाईच्या मुद्द्यांनी त्रस्त झाली आहे. जनता परिवर्तनाला अनुकूल भूमिका घेईल. यावेळी एकनाथ खडसे, प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, आमदार निलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, माजी महापौर आझम पानसरे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
संजय राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगून ‘कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे,’ असे मत पवार यांनी व्यक्त केले. ‘‘गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या जवळ पाच दहा मिनिटे थांबलो. त्यांच्या प्रकृतीवर ताण पडू नये म्हणून मी फार वेळ थांबलो नाही,’’ असे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपकडून त्यांना प्रचारासाठी उतरवण्याच्या कृतीचा निषेध नोंदवला. ही बाब माझ्यापेक्षा अधिक चांगलेपणाने एकनाथ खडसे सांगतील, असे सांगून खडसे यांच्याकडे माईक सोपवला त्यावेळी खडसे म्हणाले, ‘‘मी ४२-४५ वर्ष भाजपचे काम केले आहे. पण वाजपेयी, अडवाणी यांच्या काळातील भाजपामध्ये असे प्रकार घडत नव्हते.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.